मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे बिगुल वाजले असून अखेर तारखा घोषित झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांची तारीख घोषित केली. त्यानुसार, येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. शिवसेना-राष्ट्रवादी दोन गटांसह राज्यातील 435 पक्षांची नवी यादी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली असून निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे. तुतारी’ आणि ‘मशाल’ चिन्हांना स्थान देण्यात आलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हे कायम ठेवण्यात आली आहेत.
यादी जाहीर, कोणाला मिळालं कोणतं चिन्हं?

राजपत्रातील यादीत 5 राष्ट्रीय पक्ष, महाराष्ट्रातील 5 राज्यस्तरीय पक्ष आणि इतर राज्यांतील 9 राज्यस्तरीय पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या 416 राजकीय मान्यताप्राप्त असलेल्या पक्षांच्या चिन्हांसहित यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान या यादीमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ‘मशाल’ चिन्ह, शिवसेना (शिंदे) पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘घड्याळ’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चारही चिन्हाना नावांसहित वेगळे स्थान देण्यात आले आहे. मात्र दोन्ही राजकीय पक्षांच्या चिन्ह आणि नावावरील वादाचा अंतिम निर्णय हाँ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीला मोठा दिलासा –
न्यायालयाच्या आदेशानंतर आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले. पण लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी अशी दोन चिन्ह असल्याने मत विभाजन झालं , असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे पिपाणी हे चिन्ह काढून टाकण्याची मागणीही केली होती. अखेर आयोगाने जाहीर केलेल्या राजपत्रात आता पिपाणी हे चिन्ह वगळून टाकण्यात आलं असून फक्त तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांचा जल्लोष आणि प्रचाराला सुरुवात –
आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांचा जल्लोष आणि प्रचाराला सुरूवात झाली आहे. ठाकरेंच्या सेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवडीमध्ये जल्लोष करण्यात आला. शिवडीतील प्रभाग क्रमांक 206 सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्याने पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. सचिन पडवळ हे 2017 साली याच प्रभागातून निवडून आले आहेत. हा प्रभाग आरक्षित न होता सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्याने पून्हा सचिन पडवळ यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सचिन पडवळ यांचे अभिनंदन करून जल्लोष केला .


