नितीन गावडे
सावंतवाडी : वेत्ये गावातून सोनुर्ली येथे जाण्यासाठी बनवलेला कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपुल धोकादायक बनला आहे.
वेत्येमधील कोकण रेल्वेचा उड्डाणपूल हा मळगाव, वेत्ये व सोनुर्ली या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सोनुर्ली, न्हावेली, निरवडे व पुढे जाणारी वाहने याच उड्डाणपुलावरून जात असतात. शिवाय स्थानिकांच्या वाहनांची वर्दळ या पुलावरून होत असते.
मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांत पडत असलेल्या पावसामुळे पाणी साचून उड्डाणपुलावरील रस्ता खड्डेमय झाला असून केवळ खड्डे बुजविण्यापुरती स्थिती या रस्त्याची नसून उड्डाणपुलावरील संपूर्ण रस्त्यावर नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची गरज आहे, या उड्डाणपुलाखाली कोकण रेल्वे ची उच्च विद्युतभार क्षमतेची इलेक्ट्रीक लाईन असल्याने त्या उड्डाणपुलावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. सदर पुल हा कोकण रेल्वे च्या अखत्यारीत येत असल्याने यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व कोकण रेल्वे यांनी यापुलाची पाहणी करून गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पुढील महिन्यात दक्षिण कोकण चे पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिरचा जञोत्सव होणार आहे त्यावेळी या उड्डाणपूलावरुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, त्यामुळे अश्या धोकादायक उड्डाणपूलावरुन प्रवास करताना अपघात घडल्यास याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सोनुर्ली, वेत्ये, मळगाव, निरवडे गावातील नागरीकांनी विचारला आहे.