सावंतवाडी : गेल्या 14 ते 15 वर्षात शासकीय नोकरीला तिलांजली देऊन मळगाव येथे येऊन आपल्या ग्रामीण भागात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी परिश्रम घेत आहे. मात्र हे सर्व करत असताना अनेकदा अडचणी आल्या. काही अडचणी या नैसर्गिक होत्या तर काही या मानवनिर्मित. मात्र त्या सर्व अडचणींवर मात करून आजघडीला मळगाव येथे ‘कृषी पर्यटन’ आणि ‘नर्सरी व्यवसाय’ यात थोडेफार यश मिळवले. मात्र शासकीय कार्यालयाकडून वारंवार अपेक्षांचा भ्रमनिरास झाला, अशी खंत ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक नाना कशाळीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. मळगाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत नाना कशाळीकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कशाळीकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील गावडे उपस्थित होते.
दरम्यान पुढे बोलताना श्री. कशाळीकर म्हणाले मी आजपर्यंत कोणालाही फसवले नाही आणि खोटे व्यवसाय किंवा उद्योग केले नाहीत. जे आहे ते मी सरळ मार्गाने करीत आलो. मात्र तरीदेखील मी ज्या – ज्या वेळी माझ्या उद्योग, व्यवसायासंदर्भात शासकीय कार्यालयाची मदत मागितली, त्यावेळी शासकीय कार्यालयाकडून मला नकारात्मक प्रतिसाद मिळाला. मी केलेल्या एखाद्या अर्जावर गेली अनेक महिने शासकीय कार्यालयाकडून उत्तरही दिले जात नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे मला मानसिक त्रास होत आहे. तरी प्रसार माध्यमांतून व सामाजिक कार्य करणाऱ्यांकडून आपली ही अडचण दूर व्हावी, अशी अपेक्षा श्री. कशाळीकर यांनी यावेळी व्यक्त केली.

कमीत कमी खर्चात लग्न सुविधा देणार.! – श्रीमती कशाळीकर व सुनील गावडे यांचा मानस.
दरम्यान या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या श्रीमती कशाळीकर व सुनील गावडे म्हणाले, मळगाव येथे आपण ग्रामीण भागातील अत्यंत गोरगरीब लोकांसाठी कमीत कमी खर्चात लग्न विधी पार पाडण्यासाठी आगामी काळात मंगल कार्यालय उभारत आहोत. यात अत्याधुनिक सुख सुविधा अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांची नव्याने फ्रॅंचाईजी असलेल्या ‘पितांबरी नर्सरी’ या रोपवाटिकेबद्दल त्यांनी माहिती दिली. तरी मळगाव दशक्रोशीतील आणि सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या नर्सरीला भेट द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.
ADVT –



