सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांंना शालेय सहाय्यक शिक्षिका सौ. अमृता सावंत यांनी रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला राखी का बांधते? व राखीच्या धाग्याचे महत्त्व काय? हे विद्यार्थ्यांंना समजावून सांगितले. तसेच याच दिवशी नारळी पौर्णिमा असल्याकारणाने शालेय सहाय्यक शिक्षिका सौ. श्रावणी प्रभू यांनी विद्यार्थ्यांंना नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते?, या विषयी माहिती सांगितली. इयत्ता पहिली ते सहावीच्या सर्व विद्यार्थ्यानी मिळून ‘ फुलों का तारों का सबका केहना है’ हे गीत म्हटले. या गीताकरिता विद्यार्थ्यांना शालेय गायन शिक्षक कपिल कांबळी यांचे मार्गदर्शन लाभले. फक्त आपले सख्खे भाऊ बहीण हे आपले बांधव आहेतच पण त्याचबरोबर ‘सारे भारतीय आपले बांधव आहेत’ ही भावना विद्यार्थ्यांच्या ह्र्दयात रुजावी याकरिता, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थिनींना शालेय सहाय्यक शिक्षक सौ. ग्रीष्मा सावंत व कु. अंकिता गवस यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये नेले.
तेथे विद्यार्थ्यांनींनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व पोलीस हवालदार यांना राखी बांधली. त्याचप्रमाणे या विद्यार्थिनींनी रिक्षा स्टँडवरील रिक्षाचालकांना, पेट्रोल पंप वरील कर्मचारी व शालेय बस वाहन चालकांनाही राखी बांधली. कारण कळत नकळत हे सगळेच आपले रक्षणकर्ते आहेत. तसेच, ही बांधलेली प्रत्येक राखी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वहस्ताने तयार केली होती. याकरिता शालेय कला शिक्षिका सुषमा पालव व विनायकी जबडे यांचे विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पाडल्याबद्दल शाळेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापक प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.


