सावंतवाडी : 20 मार्च हा महाड येथे पाण्याच्या हक्कासाठी झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील पहिला संघर्ष याच क्रांतीच्या स्मृतीना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ठिक ७:३० वाजता ‘ दर्पण प्रबोधिनी ‘ आणि ‘सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग ‘यांच्या संयुक्त विद्यमाने व समता प्रेरणाभूमीच्या सहकार्याने “अभिवादन युगनायकाला” हा अभिनव कार्यक्रम गुरुवारी पार पडला. भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी पाण्याच्या हक्कासाठी महाड येथे आपला पहिला संघर्ष केला. याच संघर्षातून पुढे समतेची पहाट होऊन देशात संविधानाच्या माध्यमातून समता प्रस्थापित झाली .त्यामुळे 20 मार्च हा दिवस संपूर्ण देशात ‘क्रांती दिन’ म्हणून पाळला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व सावंतवाडी नगरपालिकेने उभारलेल्या” बाबासाहेब आंबेडकर स्मृति उद्यान तथा ‘समता प्रेरणाभूमी’त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले तर कार्यक्रमाची सुरुवात शाहीर तथा जिल्ह्यातील नामवंत कवी जनीकुमार कांबळे यांच्या क्रांतीगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी करून समता प्रेरणाभूमीच्या उभारणीचा उद्देश विशद केला तर कवी विठ्ठल कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे, सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष अनिल जाधव, ज्येष्ठ कवी जनीकुमार कांबळे, कवयित्री कल्पना मलये, कवी प्राचार्य सिद्धार्थ तांबे ,राजेश कदम इत्यादी उपस्थित होते. यावेळी महेंद्र कदम यांनी महाडचे तळे, राजेश कदम यांनी युगप्रवर्तक, सिद्धार्थ तांबे यांनी मुक्तीसंग्रामाच्या उद्गात्या , मधुकर मातोंडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर (हिंदी कविता) विठ्ठल कदम यांनी तुझं शेत, विलास कासकर यांनी ‘जग बदल घालूनि घाव ,शैलेश तांबे यांनी’ तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होते ‘,सुरेश पवार यांनी ‘भीम बाबा’ , आनंद तांबे यांनी ‘या क्षणी ‘ ,किशोर कदम यांनी “1927, 1935, 1956 डॉ. आंबेडकर” ही उत्तम पवार यांची कविता सादर केली. कवयित्री कल्पना मलये यांनी ‘समतेचा मार्ग’ , स्नेहा कदम यांनी ‘स्वतः सरळ उभारताना’, कु. स्नेहल तांबे ,यांनी ‘गडद न्याय’ ,अनिल जाधव यांनी ‘शिल्पकारा’ , विद्याधर तांबे यांनी ‘बाबा तुमच्यासारखा कोणीच दिसत नाही’ अशा अनेक क्रांतिकारी कवितांचे दर्जेदार सादरीकरण करण्यात आले. उत्तरोत्तर रंगत चढलेला कार्यक्रमा आटोपता घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी याच भूमीत पुन्हा नियोजनपूर्वक अशाच कार्य क्रमाचे आयोजन करण्याचे सुतोवाच केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्र निवेदक राजेश कदम यांनी केले तर आभार मोहन जाधव करून कार्यक्रमाचे आयोजन लवकरच करण्याची ग्वाही दिली.
प्रेरणाभूमी आपली ‘ऊर्जाभूमी ‘असल्याने येथे भविष्यात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची ग्वाही मान्यवरांनी दिली. यावेळी ॲड. संदीप निंबाळकर कवी प्रकाश तेंडुलकर, समीर कदम ,ममता जाधव केशव जाधव ,कांता जाधव आदींनी भेट दिली.


