चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १९६ धावा केल्या, त्यानंतर चेन्नईचा संघ फक्त १४६ धावा करू शकला. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईचा हा आतापर्यंतचा पहिला पराभव आहे. याआधी त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ गडी राखून विजय मिळवला होता. २००८ नंतर आरसीबीने चेपॉक स्टेडियमवर सीएसकेला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चेपॉक स्टेडियम हे चेन्नई सुपर किंग्जचा बालेकिल्ला आहे आणि येथे आरसीबीने शेवटचा २००८ मध्ये चेन्नईचा पराभव केला होता. त्या सामन्यात बेंगळुरूने चेन्नईवर १४ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर, दोन्ही संघ चेपॉक मैदानावर ८ वेळा एकमेकांसमोर आले, ज्यामध्ये प्रत्येक वेळी चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. आता अखेर आरसीबीने चेपॉक स्टेडियमवर सीएसकेविरुद्ध सलग ८ पराभवांची मालिका संपवली.
आरसीबीचा सलग दुसरा विजय –
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी आरसीबीने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव केला होता. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पॉइंट्स टेबलमध्ये आपले पहिले स्थान निश्चित केले. दोन्ही सामने जिंकल्यानंतर आरसीबी आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आरसीबीने सीएसकेच्या
बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी नोंदवल पहिला विजय –
लक्ष्याचा पाठलाग करताना, सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि जोश हेझलवूडने त्यांना दोन धक्के दिले. यानंतर सीएसकेला दीपक हुड्डाच्या रूपाने तिसरा धक्का बसला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने रचिनसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न केला, पण यश दयालने या दोन्ही फलंदाजांना आपले बळी बनवले. शिवम १९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटच्या षटकात, धोनीने कृणाल पंड्याला सलग दोन षटकार आणि एक चौकार लगावला, परंतु आरसीबी संघ चेपॉकवरील विजयाचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी झाला.
सॉल्ट आणि कोहलीच्या मदतीने आरसीबीने चांगली सुरुवात केली होती, परंतु सीएसकेने पुनरागमन केले. आरसीबीकडून सॉल्टने ३२ धावा, कोहलीने ३१ धावा, देवदत्त पडिक्कलने २७, जितेश शर्माने १२ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने १० धावा केल्या. सीएसकेकडून फिरकी गोलंदाज नूर अहमदने सर्वाधिक तीन, मथिशा पाथिरानाने दोन आणि खलील अहमद आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.


