दापोली : तालुक्यातील मुरुड येथून कवठेमहांकाळ येथे जाणारी कार जळून भस्मसात झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील निगडेनजीक गुरुवारी दुपारी घडली. चालकाच्या प्रसंगावधानाने त्याच्यासह अन्य दोघेजण बालंबाल बचावले. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.
चालक शुभम बापूसाहेब साबळे (२९, रा. कवठेमहांकाळ, सांगली) हे कारमधून (एमएच १०, एजी २०६६) आकाश जगन्नाथ शिंदे, रेश्मा प्रकाश शिंदे (दोघेही रा. मुरूड-दापोली) यांना घेऊन मुरुड येथून कवठेमहांकाळ येथे जात होते. भोस्ते घाट चढून कार निगडेनजीक आली असता कारच्या इंजिनमधून धूर आला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने कार रस्त्यालगत थांबवत दोघांनाही बाहेर पडण्यास सांगितले. कारमधील साहित्यही बाहेर काढले. काही क्षणातच आगीचा भडका उडून कार जळून भस्मसात झाली.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील ताठरे, पोलिस कॉन्स्टेबलतुषार राठोड, पोलिस हवालदार सुधाकर रहाटे घटनास्थळी पोहचले. आग आटोक्यात आणण्यासाठी एमआयडीसीतील अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण केले होते.


