मुंबई : राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या नव्या ई-बाईक धोरणामुळे प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जाणार असून, मुंबई महानगर प्रदेशात १० हजार तर संपूर्ण महाराष्ट्रात २० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
पर्यावरणपूरक आणि परवडणारा प्रवास –
ई-बाईक सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना रिक्षा-टॅक्सीसाठी द्यावे लागणारे १०० रुपये भाडे केवळ ३० ते ४० रुपयांत भागणार आहे. तसेच, महिलांच्या सुरक्षिततेसाठीही या धोरणात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यात बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या धोरणासाठी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या वाहनांना इलेक्ट्रिक बाईकच असणे आवश्यक राहील आणि त्या पिवळ्या रंगात रंगवल्या जातील. हा निर्णय पर्यावरणपूरक तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणारा ठरणार आहे. यामध्ये महिला चालकांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
प्रत्येक वाहनात जीपीएस आणि संकटकालीन संपर्क सुविधा अनिवार्य, प्रवासी आणि चालकांसाठी विमा संरक्षण, वाहतुकीचा वेग पडताळणी यंत्रणा, दुचाकी चालकांची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक अशा सुरक्षा आणि सेवा गुणवत्ता या धोरणानुसार, सेवा देणाऱ्या बाईक टॅक्सी अॅग्रिगेटर्ससाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळाने या धोरणाला मंजुरी दिली असून, पुढील एक ते दोन महिन्यांत ही सेवा प्रत्यक्षात सुरू केली जाणार आहे. याशिवाय, रिक्षा-टॅक्सी महामंडळाच्या सदस्यांच्या मुला-मुलींना बाईक खरेदीसाठी १० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे, उर्वरित रक्कम त्यांना कर्जरूपाने उभारावी लागेल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगलीसारख्या महानगरांमध्ये टॅक्सीने प्रवास करणे फारच महाग झाले आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने महानगरांमधील टॅक्सीचा प्रवास देखील महाग झाला आहे. मात्र, आता लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू होणार आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांचा टॅक्सीचा प्रवास अधिक किफायतशीर होईल ,अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ADVT –



