चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलच्या वसतिगृहातील एका खोलीत १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 2 एप्रिल 2025 रोजी उघडकीस आली. रोहन संदीप घाग्राम असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा मूळचा चिपळूण तालुक्यातील तुरंबव पालेवाडी येथील रहिवासी होता. तो सध्या डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलच्या वसतिगृहातील 105 क्रमांकाच्या खोलीत राहत होता. तो आणि त्याचा मित्र पार्थ हे एकत्र शिकत होते. 2 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या दरम्यान, रोहनने खोलीत गळफास घेतला. दुपारी रोहन कॉलेजला आला नाही म्हणून पार्थ आणि शुभम हे त्याच्या खोलीत गेले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी तो ढकलून उघडला. तेव्हा रोहनने नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. तात्काळ डेरवण हॉस्पिटलच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी करून रोहनला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रोहनने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


