. रायगड पाली-सुधागड, येथे ३०० कुटुंबांना मिळाले रेशन,कपडे आणि बेडशीट्स – ॲड. उषा तन्ना यांचे मौलिक सहकार्य.
मुंबई : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असल्या तरी आजही काही आदिवासी पाडे या गरजांपासून वंचित आहेत. रायगड जिल्ह्यातील पाली-सुधागड तालुक्यातील काही पाड्यांमध्ये अजूनही अन्नसुरक्षा, कपड्यांची उपलब्धता आणि निवाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या पाड्यातील ही गरज ओळखून, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ऍडव्होकेट उषा तन्ना यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ३०० आदिवासी व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे कोरडे रेशन किट, महिलांसाठी कपडे आणि चादरी पुरवण्यात आल्या. या विभागातील अनेक लोक दारिद्र्यरेषेखालील गणनेत मोडतात. येथील लोकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे त्यांना चांगले अन्न मिळावे आणि रात्रीच्या थंडीपासून मुक्तता मिळावी, या हेतूने या वाटपाचे नियोजन करण्यात आले, असे ॲड. उषा तन्ना यांनी सांगितले. या वाटपामुळे त्यांना अन्नसुरक्षा मिळावी आणि आव्हानात्मक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी मदत व्हावी, हेच उद्दिष्ट ठेवून कोकण संस्थेच्या वतीने हे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात ॲड. उषा तन्ना या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोकण संस्था अध्यक्ष दयानंद कुबल, सुरेश राज, स्नेहा राज, मधुमती राज आणि ॲड. विजय हरळकर पाली नगर पंचायतच्या नगरसेविका प्रणाली शेठ, सामाजिक कार्यकर्ते संजोग शेठ, सरपंच विश्वास भोई, तसेच सामाजिक कार्यकर्ते चेतन गायकवाड यांचा सहभाग होता.
या उपक्रमादरम्यान ॲड. उषा तन्ना यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून मी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेशी जोडलेली आहे. गावागावात जाऊन समाजोपयोगी उपक्रम राबवणे, गरजूंना मदतीचा हात देणे हेच माझं जीवनध्येय आहे. माझ्याकडे जे काही आहे, ते मी समाजासाठी आणि गरजू लोकांसाठी वापरू इच्छिते.” तसेच कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण संस्थेचे कार्यकर्ते प्रीती पांगे, नागसेन खडसे, साक्षी पोटे, निलेश खामकर आणि अनेक शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. संदेश गायकवाड यांनी हा कार्यक्रम आदिवासी लोकांसाठी आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
एक हात मदतीचा, एक पाऊल सेवेकडे – या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आला.


