कोलकाता : आयपीएल 2025 स्पर्धेतील 21वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती. या खेळपट्टीचा लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. 20 षटकात 3 गडी गमवून 238 धावा केल्या आणि विजयासाठी 239 धावांचं आव्हान दिलं. यावेळी मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी आक्रमक खेळी केली. मिचेलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार मारत 81 धावा केल्या. तर निकोलस पूरनने 38 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकाराच्या मदतीने नाबाद 87 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण कोलकात्याच्या फलंदाजांनी तशीच साजेशी खेळी केली. पण धावांचा पाठलाग करणं काही जमलं नाही. रिंकु सिंहने शेवटच्या काही षटकात फटकेबाजी करत सामन्यात येण्याचा प्रयत्न केला. पण तसं काही शक्य झालं नाही.


