Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

आंब्याला ‘युआयडी’ सील देण्यासाठी प्रयत्न, बाजार समितीमुळे होणार शेतकऱ्यांची उन्नती.! : पणन मंत्री जयकुमार रावल. ; वाघेरी येथील बाजार समिती इमारतीचे पणन मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन.

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे शासन हे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे. शेतकरी मेहनत करतो, कष्ट करुन पिक घेतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक बाजार समिती किंवा उपबाजार समिती उभी करावी असा शासनाचा संकल्प आहे. बाजार समितीच्या माध्यमातून मालाला योग्य भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये बाजार समितीची भूमिका महत्वपूर्ण राहिल असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन पणन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत कोनशिला अनावरण करून पार पडले, यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी मंत्री श्री. रावल म्हणाले, प्रत्येक तालुक्यात बाजार समिती किंवा उप बाजार समिती स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. बळीराजाला केंद्रबिंदू मानून शासन काम करत आहे. 100 दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत या पहिल्या बाजार समितीचे भूमिपूजन होत आहे. राज्यात एकूण 305 बाजार समित्या तर 662 उप बाजार समित्या असून सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची उलाढाल या वेगवेळ्या बाजार समितींच्या माध्यमातून होते. आज वाघेरी येथे पहिल्या बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे. टप्प्याटप्प्याने अनेक ठिकाणी उप बाजार समितींची देखील उभारणी करुन जिल्ह्याचा विकास केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 5 कोटी 66 लाख रुपयांच्या कामाचे आज भूमिपुजन करण्यात आले आहे. येणाऱ्या 18 महिन्यांमध्ये ही इमारत पूर्ण होणार आहे. या इमारतीमध्ये फळ व धान्यासाठी साठवणूक केंद्र, काजू बी साठविण्यासाठी गोडाऊन, मत्स्य उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज, व्यापारी भवन, दुकानगाळे, वे-ब्रिज, पाण्याची सुविधा, शेतकरी भवन, हमाल भवन आणि इतर साऱ्या व्यवस्था उभा राहणार आहेत. या इमारतीसाठी सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून 75 टक्के निधी मिळाला आहे. उर्वरित 25 टक्के निधी उभारावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या ॲग्रीकल्चर मार्केटींग इन्‍फ्राट्रक्चर योजनेच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी मी या प्रकल्पाला देणार आहे. या मार्केट कमिटीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साधला जाणार आहे असेही ते म्हणाले.
श्री रावल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा महत्वाचे फळ आहे. या मातीमध्ये लोह असल्याने या आंबाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. म्हणूनच आंब्याच्या जीआय टॅगिंगच्या संदर्भात आपण भूमिका घेतली आहे. पुढील काळात आंब्याला युआयडी सील व पॅम्पर प्रुफ सिल हे येथील मार्केट मध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ई-नाम योजनेअंतर्गत डिजिटल डिस्प्ले बोर्डवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारभावांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. काजू बोर्डामार्फत जवळपास 370 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. पणन महामंडळामार्फत घेतला जाणारा ‘आंबा महोत्सव’ यावर्षी कोकणात घेतला जाईल असेही ते म्हणाले.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, या बाजार समितीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोणातून एक महत्वाचं स्थान बनवू असा विश्वास मी देतो. या ठिकाणी सर्व कारभार पारदर्शक पध्दतीने होईल. बाजार समितीची ही जागा रेल्वे लाईन तसेच महामार्गालगत असल्याने निर्यातीसाठी योग्य आहे. निसर्गातील बदलांमुळे आंबा आणि काजू उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. स्थानिक काजूला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळावी यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे. बांदा येथे मच्छी बाजारासाठी नक्कीच जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्व प्रयत्न करणार असल्याचेही श्री. राणे म्हणाले.

उपाययोजना

खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी विविध उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घ्यावीत जेणेकरुन त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढेल. एकरी उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील महिलांनी देखील व्यवसायात सहभाग घेऊन उत्पन्न वाढवावे, असेही ते म्हणाले.

आमदार दीपक केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यात या बाजार समितीचे योगदान मोठे असणार आहे. या इमारतीत सर्व प्रक्रीया उद्योग एकाच छताखाली आले तर शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे असेही ते म्हणाले.

आमदार निलेश राणे म्हणाले की, ही बाजार समिती कोकणाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारी बाजारपेठ ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी या बाजार समितीने काम करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील वेगवेगळे उत्पादन घेऊन विकास साधावा असेही ते म्हणाले.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles