नाशिक : सिंधुदुर्गमध्ये आत्तापर्यंत 27 खून झाले असून त्यातील 9 खून हे शिवसैनिकांचे असल्याचा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. सिंधुदुर्गमध्ये आजही हत्याकांडं सुरूच असल्याचाही गंभीर आरोप राऊतांकडून करण्यात आला आहे. वैभव नाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजेत असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना राऊत यांनी म्हंटलं की, नाईक त्या ठिकाणी 10 वर्ष आमदार होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्याच्याशी वैभव नाईक सातत्याने आणि संघर्षाने लढा देत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 27 खून झाले आहेत. त्यातले 9 खून हे शिवसैनिकांचे आहेत. अत्यंत निर्घृणपणे त्यांना मारण्यात आलं आहे. आजही त्याठिकाणी असे हत्याकांड सुरूच आहेत. यांचा आका कोण आहे त्याबद्दल वैभव नाईक यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं असल्याची टीका देखील राऊत यांनी यावेळी केली.


