मुंबई : बॉलिवूड स्टार्स जेवढे त्यांच्या प्रोफेशनल लाईफसाठी प्रसिद्ध असतात, तेवढेच ते त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. अनेकदा बॉलिवूड स्टार्सच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत असतात. हृतिक रोशनपासून ते सैफ अली खानपर्यंत, अनेक दिग्गज लग्नानंतर त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत राहिले. अनेक सिने कलाकारांना घटस्फोटासाठी त्यांच्या पत्नीला मोठी पोटगी द्यावी लागल्याचं आपण ऐकलंय. पण, बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील अशीही एक अभिनेत्री आहे, जिनं नेमकं याच्या उलट केलंय. घटस्फोटावेळी अभिनेत्रीनं पतीकडून पोटगी घेतली नाहीतर, पतीला भलीमोठी रक्कम पोटगी म्हणून दिली आहे. ऐकून धक्का बसला ना, पण, अभिनेत्रीनं नेमकं असं का केलं? या दिग्गज अभिनेत्रीचं नाव काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत तुम्हाला सांगत आहोत, ती अभिनेत्री म्हणजे, ग्लॅमरस, बोल्ड अन् क्लासी श्वेता तिवारी. टेलिव्हिजनवर ‘प्रेरणा’ म्हणून घराघरांत पोहोचलेल्या श्वेता तिवारीनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. मात्र, यावेळी तिचा अभिनय आणि तिचे स्टायलिश फोटो नाहीतर तिचं पर्सनल आयुष्य चर्चेचा विषय बनलं आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही धक्कादायक अनुभव तिच्या वाट्याला आले. याबाबत श्वेतानं स्वतः खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना श्वेतानं तिची दोन्ही लग्न, घटस्फोट, तिनं दिलेली पोटगी आणि तिच्या दोन्ही मुलांबाबत मोकळेपणानं भाष्य केलं आहे.
लग्नानंतर काहीच वर्षांत घरगुती हिंसाचाराची शिकार…
वयाची चाळीशी ओलांडलेल्या आणि दोन मुलांची आई असलेली श्वेता तिवारी आजही आपल्या क्लासी अदांसाठी ओळखली जाते. आजही श्वेता अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. श्वेता तिवारीनं 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं होतं. श्वेताचं हे लग्न इंटरकास्ट मॅरेज होतं. श्वेता तिच्या घरातील पहिली मुलगी होती, जिनं इंटरकास्ट मॅरेज केलं होतं. मात्र या लग्नानंतर श्वेताच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. काही दिवस सहन केल्यानंतर श्वेतानं तिच्या आयुष्यातला मोठा निर्णय घेतला. श्वेतानं राजा चौधरीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला. पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर 2012 मध्ये श्वेता आणि राजा चौधरीचा घटस्फोट झाला. पण, या घटस्फोटासाठी पतीला नाहीतर श्वेताला फार मोठी किंमत चुकवावी लागली होती.
…अन् श्वेतानं ९३ लाखांची पोटगी दिली –
मुलाखतीत बोलताना श्वेतानं तिच्या घटस्फोटाबाबत खुलासा केला. श्वेता म्हणाली की, “मला पोटगी म्हणून काहीच मिळालं नाही, उलट मीच 93 लाखांची प्रॉपर्टी राजा चौधरीच्या नावावर केली. फक्त घटस्फोटासाठी.” त्याचं झालं असं की, श्वेतानं आणि तिच्या पतीनं दोघांनी एकत्र एक घर घेतलं होतं, जे घटस्फोटानंतर आपल्या नावावर करावं, अशी तिच्या पतीची अपेक्षा होती. श्वेतानं सुचवलेलं की, ते घर तिची मुलगी पलकच्या नावावर केलं जावं, पण राजा चौधरीनं यासाठी स्पष्ट नकार दिला. श्वेतानं याबाबत सांगताना म्हटलं की, “मी पुरती हादरुन गेलेले, ज्यावेळी त्यानं म्हटलं की, “मुलगी नको, पण घर हवंय…”. हा क्षण तिच्या आयुष्यातील एक मोठा धक्का होता. दरम्यान, श्वेता आणि राजा यांच्या घटस्फोटाच्या तडजोडीत, श्वेताला 93 लाख रुपयांचा फ्लॅट सोडावा लागला.
दुसरं लग्न केलं, पण तिथेही तेच झालं…
राजा चौधरीपासून घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचा बहर आला. श्वेता आणि अभिनेता अभिनव कोहली यांच्यात प्रेम फुलंलं. प्रेमात पडल्यानंतर दोघांनी 2013 मध्ये लग्न केलं. काही काळ दोघांनीही सुखाचा संसार केला, त्यांना एक मुलगाही झाला. पण, काही वर्षांनी नात्यात मिठाचा खडा पडला. दोघांनीही काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.
दरम्यान, श्वेता तिवारी सध्या सिंगल मदर असून ती तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ एकटी करते. काही दिवसांपूर्वीच श्वेताची मुलगी पलक तिवारीनं बॉलिवूड डेब्यू केला. याशिवाय श्वेता तिवारी अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतं.


