बेगुसराय : बिहार राज्यातील बेगुसराय येथून धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्याच सहा वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. अनैतिक संबंधास अडथळा ठरत होता म्हणून या महिलेने तसे कृत्य केले आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या मुलाला अॅसिड पाजून त्याचा जीव घेतला आहे. या घटनेनंतर संपूर्ण बिहार हादरले असून महिलेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
पतीच्या मृत्यूनंतर तरुणाशी प्रेमसंबंध –
पोलिसांनी मुलाच्या हत्येचा आरोप असलेल्या महिलेला ताब्यात घेतलं असून तिची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मोसादपूर गावातील आहे. येथे ललन कुंवर नावाच्या व्यक्तीचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर ललन यांची पत्नी आणि मुलगा काम करून चरितार्थ भागवायचे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर नंतर ही महिला आपल्या मुलासह बलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुसैना या गावी स्थायिक झाली. याच ठिकाणी या महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी भेटायचे.
प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे उचललं टोकाचं पाऊल –
आरोपी महिलेचा मुलगा साधारण सहा वर्षांचा होता. हाच मुलगा महिलेच्या प्रेमसंबंधात वेळोवेळी अडथळा ठरायचा. प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे या महिलेला तिच्या मुलाची अडचण होऊ लागली. याच कारणामुळे आपल्याच पोटच्या मुलाला संपवण्याचा कट तिने रचला. त्यानंतर प्रियकराच्या सल्ल्यानुसार या महिलेने आपल्याच सहा महिन्यांच्या मुलाला अॅसिड पाजून त्याची हत्या केली.
रुग्णालयात दाखल केलं पण…
अॅसिड पाजल्यानंतर मुलाची प्रकृती बिघडत चालली होती. याबाबत मुलाच्या आजीला समजलं. त्यानंतर या मुलाला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान या मुलाचा दुर्वैवी मृत्यू झाला.
प्रियकर फरार, तपास चालू –
ही घटना समोर आल्यानंतर रिफायनरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास चालू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या हत्येमागे अनैतिक संबंध हे कारण आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिच्या प्रियकराचा आता शोध घेतला जात आहे.


