सावंतवाडी : तालुक्यातील कवठणी गावाचे भूमिपुत्र, उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्व सत्यवान यशवंत रेडकर, (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क) यांना कोकणातील मातीशी नाळ जोडत शैक्षणिक क्षेत्रात अविरतपणे देत असलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल कोकण विकास समितीमार्फत “कोकणरत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. “शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव” व”भ्रष्टाचार मुक्त प्रशासन” ही नाविन्यपूर्ण संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी श्री. सत्यवान यशवंत रेडकर हे संपूर्ण महाराष्ट्रात निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने देऊन शासकीय यंत्रणेत महाराष्ट्रातील परिणामी कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल व्हावेत यासाठी कोणत्याही स्वरूपाचे मानधन न घेता ज्ञानदान करत असतात. जवळपास ३२५ निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने पूर्ण झाली असून २२ यशोगाथा सुद्धा निर्माण झाल्या आहेत.
हा “कोकणरत्न पुरस्कार” मुलुंड (पू) येथील छत्रपती राजे संभाजी सांस्कृतिक भवन येथे २३-२७ एप्रिल २०२५ च्या दरम्यान आयोजित कोकण विकास महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जयवंत शं दरेकर, अध्यक्ष-संस्थापक कोकण विकास समिती व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. या पुरस्काराचा स्वीकार त्यांची आई, द्रौपदी रेडकर यांनी स्वीकारला. यावेळी “तिमिरातूनी तेजाकडे” या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन यशवंत रेडकर उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रातील योग्य व्यक्तीची निवड “कोकणरत्न पुरस्कार” साठी केल्यामुळे कोकण विकास समिती व टीमचे आणि पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. रेडकर सरांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.


