वाचक मित्रहो,
काही वर्षापूर्वी जगाचे विभाजन प्रगत राष्ट्रे व मागासलेली राष्ट्रे असे गेले जात होते . त्यावेळी आपण मागास राष्ट्रांच्या गटात होतो . परंतु मागासलेल्या राष्ट्रांना आपण मागासलेले आहोत याची लाज वाटत नव्हती तर आपल्याला मागास म्हटले जात आहे याची लाज वाटत होती . म्हणून मग हे विभाजन विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे असे केले जाऊ लागले.
कालांतराने विकसित राष्ट्रे समृद्ध राष्ट्रे म्हणून ओळखली जाऊ लागली. यासंदर्भात राज ठाकरे यांना प्रश्न पडला होता की, स्वित्झरलंड, फिनलंड, नॉर्वे, इंग्लंड अशा राष्ट्रामध्ये ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी जनतेचे कोणते प्रश्न असतात?
आपल्याकडे जसे वीज पाणी रस्ते , शेतकरी आत्महत्या , बेकारी हे प्रश्न असू शकतात परंतु तेथे तर हे प्रश्नच नाहीत. या देशातील जनता खाऊन पिऊन सुखी व समृद्ध जीवन जगते अशा वेळी जनतेमधे कोणते प्रश्न चर्चिले जात असतील. तर अशावेळी आपला धर्म , पूर्वज, इतिहास, साहित्य किंवा साहित्यिक वाद, संस्कृती विषयक चर्चा या देशात व्हायला हव्यात व तशा होत ही असतील. कारण अशा गोष्टी सुचण्यासाठी माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ण झालेल्या असायला हव्यात.
परंतु वास्तविक अशा चर्चा आणि वाद तर आपल्याकडे मोठया प्रमाणात होत आहेत . कोणाच्या धर्माच्या आस्थेला धक्का पोहोचतो व त्यावरून प्रचंड रणकंदन होते.
कोणा इतिहासातील महापुरुषाचा अपमान होतो व त्यावरून विधिमंडळामध्ये किंवा संसदेमधे हलकल्लोळ माजतो . कोणा धर्माच्या प्रार्थना स्थळाला धक्का लागला म्हणून दंगल होते. या आणि अशा कितीतरी बाबी आहेत की ज्यांचा वास्तविक दैनंदिन मानवी प्राथमिक गरजांच्या पूर्ततेशी काहीही संबंध नाही.
याचा सरळ अर्थ असा होतो की, आपल्या देशातील जनतेच्या प्राथमिक गरजा पूर्ण झालेल्या आहेत. या देशात आता अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात आता कोणत्याही सुधारणेची गरज नाही. म्हणजेच आता आपण समृद्ध देशाच्या पंगतीत जावून बसलो आहोत. त्यामुळे आपल्या निवडणुकात शैक्षणिक सुधारणा , बेकारी निर्मूलन, विषमता , कायदा व सुव्यवस्था, आरोग्यसेवेमध्ये सुधारणा असे विषय नसतात . आपली अर्थव्यवस्था ( दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकात किती काअंतर असेना व दरडोई उत्पन्नात किती कां फरक असेना) ही आता पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर येत आहे.
त्यामुळे आता आपण केवळ देव, धर्म, इतिहास, कला, संस्कृती या विषयीच चर्चा करायच्या व त्यावर काम भागत नसेल तर वाद घालायचे आणि तेही पुरेसे वाटत नसेल तर रस्त्यावर येण्यात काहीही गैर नाही. कारण आता आपण खरोखरचं समृद्ध झालो आहोत?
– डॉ. ह. ना. जगताप.
ADVT –
https://satyarthmaharashtranews.com/12262/


