वैभववाडी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप ठिकाणी अश्मकालीन कातळ शिल्पे आहेत. सुमारे 200 पेक्षा अधिक ठिकाणी 2000 पेक्षा जास्त जांभ्या दगडावर किंवा कातळावरती ही शिल्पे कोरलेली आहेत. त्याचा निश्चित कालावधी उपलब्ध नसला तरी काही संशोधकांच्या मते ही कातळ शिल्पे 2500 ते 5000 वर्षांपूर्वीची आहेत.
यापैकी आणखी एक ठिकाण म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्यातील कोकिसरे गाव. कोकण प्रदेशातील बहुतांश कातळ शिल्पे ही जांभ्या दगडात कोरलेली आहेत. परंतु कोकिसरे येथील कातळ शिल्पे ही नावाप्रमाणे पूर्णतः कातळावर कोरलेली आहेत. वैभववाडी तालुका मुख्यालयापासून 4 कि मी अंतरावर व कोकिसरे रेल्वे फाटक (तरळे कोल्हापूर नॅशनल हायवेवरील) येथून 3 कि. मी. अंतरावर नवाळेवाडी- बौद्ध वाडी या जुन्या पायवाट रस्त्यावर कातळ शिल्पे कोरलेली आहेत. नुकतीच या ठिकाणी कुटुंबियांसमवेत भेट दिली. सोबत वाट दाखविण्यासाठी स्थानिक रहिवाशी विजय यशवंत जाधव होते.
तसे कोकिसरे माझे आजोळ. माझ्या बालपणी आजोळला जायची ही पायवट या कातळ शिल्पावरून जायची. मोठमोठया चौकोनी, आयताकार आकारावरून चालताना बुजुर्ग लोक ही पांडवांची पाऊले आहेत असे म्हणायचे. पण इतकी पाऊले कशी म्हणल्यावर कोणाकडे उत्तर नसायचे. आम्हीही मग विसरून या कातळावरील निसर्ग सौंदर्य म्हणजे बारमाही वाहणारे पाणी व उंचावरून पडणारे पाणी म्हणजे बारमाही धबधबे. पूर्वी ग्रामीण लोक याला वजर (उंच जागेवरून पडणारे पाणी) म्हणायचे. पुढे हा धबधबा कोलांटी उड्या घेत शांती नदीला जाऊन मिळतो.

माझ्या लहानपणी कोकिसरे गावाला कोकणचे कॅलिफोर्निया म्हणायचे. बारमाही शेती, सगळीकडे हिरवेगार मळे, पाटातून झुळझुळ वाहणारे पाणी पाहून मन प्रसन्न व्हायचे.आज लोक शेती करत नसल्याने बारमाही हिरवळ नाहीसी झाली आहे. या ठिकाणी पूर्वी पाणी कातळावरून वहायचे, ते आता शेतजमिनीतून वाहते व शेतातील चिखल, गाळ एके ठिकाणी धबधब्या जवळच कातळावर वाहून आलेला आहे. तरीही येथील बारमाही वाहणारा धबधबा किंवा त्याचे निसर्ग सौंदर्य किंचितही कमी झालेले नाही. उलट कातळावरील पाण्याचा प्रवाह बदलल्याने संपूर्ण कातळशिल्पे दिसत आहेत, व पूर्वीचे गैरसमज दूर झालेत.


या ठिकाणी असलेली ही शिल्पे ही मानवी पाऊले नसून निश्चित आकार असलेली कातळशिल्पे आहेत. त्याला एक संगती आहे. मोठया चौकोनात लहानमोठया आयताकृती, त्रिकोणी, चौकोनी, गोलाकार दगडी आकारात ही शिल्पे आरेखली आहेत. जसे आपण दगडी बांधकाम करतो व एकावर एक थर रचतो व त्यातील गॅप छोट्या दगडाने भरून काढल्यावर लांबलचक दगडी भिंतीचे चित्र जसे दिसेल अशी प्रथम दर्शनी ही रचना दिसते. तसेच दगडी बांधकाम केल्यावर जसे सिमेंट किंवा चुन्याने सभोवतालचे थर जोडतो तसेच वाटते.



कोकणातील इतर कातळ शिल्पे ही छोटया छोटया आकारात पाहायला मिळतात पण येथील शिल्पे ही सुमारे अर्धा किमी लांब व 20 ते 30 मिटर रुंदीच्या पट्टयात बऱ्याच ठिकाणी सलग रेखाटलेली आढळतात. दोन ठिकाणी तर मुसळ आत जाईल अशा पद्धतीचे होल आहेत. पूर्वी येथून पाणी वाहायचे, त्यामुळे भूमिगत जलसाठा किंवा भुगर्भधारण यासारखी सुद्धा रचना असू शकते. ही कातळ शिल्प दगडी बांधकाम पद्धतिची रचना पाहता एकवेळ असेही वाटते कि जमिनीच्या पोटात एक प्राचीन नगरच गडप झाले आहे कि काय आणि त्याच्या पाऊलखुणा वरून दिसताहेत, कारण बांधकाम पद्धतीतील असणाऱ्या मोठ मोठया प्रमाणबद्ध आकारातील भेगा. काही स्थानिक मंडळीच्या मते ही एकादी लिपीही असू शकते.
येथील कातळ शिल्प व प्रमाणबद्द रचना यावर अधिक संशोधन व्हायला हवे.


सर्वांनी या निसर्ग रम्य ठिकाणी भेट द्यायला हवी व हा अमूल्य पुरातन ठेवा पहायला व जपायला हवा. आवर्जून नक्की भेट द्या.
मला मात्र माझे हरवलेले बालपण 40 वर्षानंतर नव्याने भेटले व येथील कातळ शिल्पाची नव्याने ओळख झाली, व शिकण्यासाठी आणखी एक विषय मिळाला याचा निश्चितच आनंद आहे.
– इंजि. संजय भिकाजी जाधव, वैभववाडी.


