कटिहार : भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचा मुरीदके तळ यांचा समावेश आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या कारवाईचे देशभरातून कौतुक होत असून अखेर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या जीवांचा बदला घेण्यात आला अशी भावना व्यक्त होत आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आणि 26 जणांना नृशंसपणे ठार केलं. अखेर या हल्ल्याच्या 2 आठवड्यांनी भारताने कारवाई करत दहशवाद्यांचे तळ मुळापासून उखडून काढले. या कारवाईनंतर कोट्यावधी भारतीयांनी सुखाचा श्वास घेतला.
कालपासून सर्वत्र ऑपरेशन सिंदूरचीच चर्चा सुरू, ज्याच्या त्याच्या तोंडी हेच नाव आहे. याचदरम्यान बिहारच्या कटिहारमधून एक चांगली बातमी समोर आली आहे. बिहारच्या एका दांपत्याला कन्यारत्न प्राप्त झालं. भारताने दहशतवादविरोधात केलेल्या कारवाईचं कौतुक करत, त्याच्या सन्मानार्थ बिहारच्या या दांपत्याने आपल्या मुलीला अनोखं नाव दिलं आहे. त्यांनी आपल्या मुलीचं नाव ठेवलं – सिंदूरी… वाचून आश्चर्य वाटलं ना ? पण हेचं खरं आहे. सर्व देशवासीय ऑपरेशन सिंदूरमुळे खुश आहेत. त्याप्रमाणेच बिहारचं हे दांपत्यही, त्यांनाही या कारवाईचा अभिमान आहे. त्याचप्रीत्यर्थ त्यांनी मुलीला ‘सिंदूरी’ हे अनोखं नावं दिलं.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कुर्सेला येथील रहिवासी संतोष मंडल आणि राखी कुमारी यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव सिंदूरी ठेवलं. ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांविरोधात कारवाई झाली, त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा जन्म झाला, असं कुटुंबातील सदस्यांचे म्हणणं आहे. आपल्या लेकीने मोठं होऊन सैन्यातील अधिकारी बनून देशसेवा करावी, असं त्यांचं स्वप्न आहे.


