फिरोजपूर : सध्या भारत पाकिस्तान सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानकडून भारतावर सूड उगवण्यासाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनने निवासी भागावर हल्ला केला आहे. यात एक कुटुंब जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या या जखमी कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सातत्याने सीमाभागात हल्ले केले जात आहेत. नुकतंच पंजाबच्या फिरोजपूरमधील खाई या गावात पाकिस्तानने ड्रोनद्वारे हल्ला केला. या हल्ल्यामुळे एका घराला आग लागली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या उपचारासाठी त्यांना फिरोजपूरमधील एका जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


