मुंबई : केंद्र शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक, शाळा, महाविद्यालयांना फायदेशीर ठरणारी ‘ज्ञान पोस्ट’ ही नवी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत टपाल कार्यालयाकडून पुस्तके व शैक्षणिक साहित्य अल्पदरात पाठवणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाचनालयांसाठी देखील ही योजना उपयुक्त ठरणार आहे. सर्व विभागीय पोस्ट कार्यालयांमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
अनेक पाल्य आपल्या घरापासून दूर किंवा परराज्यात शिक्षण घेत असतात. अशा पाल्यांना या योजनेच्या माध्यमातून पुस्तके अथवा शैक्षणिक साहित्य अल्प दरात पाठवता येणार आहे. पुस्तके पाठविण्यासाठी पोस्टाकडून सवलतीचे काही दर देखील निश्चित करण्यात आले. त्यानुसार ३०० ग्रॅम वजनापर्यंत २० रुपये, ३०१ ते ५०० ग्रॅमसाठी २५ रुपये, ५०१ ते १००० ग्रॅमसाठी ३५ रुपये, तर ४००१ ते ५००० ग्रॅमसाठी १०० रुपये शुल्क निश्चित केले. यासाठी जीएसटी आकारला जाणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये –
डाक विभागाने सुरू केलेल्या ‘ज्ञान पोस्ट’ या योजनेद्वारे शैक्षणिक पुस्तके, नोट्स, प्रश्नसंच, अभ्यासक्रमात असलेली पुस्तके, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्वरूपाची साहित्य असलेली पुस्तके, स्पर्धा परीक्षांची पाठ्यपुस्तके, विविध भाषांतील खंड पाठवता येऊ शकतात. देशभरातील कोणत्याही भागात ही सेवा उपलब्ध असणार आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार असून त्यांना शिक्षणसामग्री मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.
…………………………………….


