कुडाळ : भारतीय संविधानाने शेकडो वर्षे परंपरेने लादलेली मनुस्मृतीची व्यवस्था संपुष्टात आणली. मात्र ही व्यवस्था पुरुषी माध्यमातून पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. शिवाय अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट करून विविध माध्यमातून त्यांचा विविध माध्यमातून छळ केला जात आहे. अशावेळी संविधान प्रेमी अन् मनुस्मृतीच्या विरोधात संघटितपणे उभे राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांनी रविवारी कुडाळ येथे केले.
स्त्रीवादी चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्त्रीमुक्ती परिषदेने “मनुस्मृती नको संविधान हवे.!” या विषयावर कुडाळ येथील महालक्ष्मी हॉटेलच्या सभागृहात विचार मंथन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. अंधारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. संध्या गोखले होत्या. या विचारपीठावर अँड. असून्ता पारधे, क्षमाताई दलवाई, सुजाता गोठोस्क, मंदा म्हात्रे, डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. रेखा महाडेश्वर, कमलताई परुळेकर, ,डॉ.अनुराधा यांसह अन्य मान्यवर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दिपाली तेंडुलकर यांच्या प्रेरणा गीताने करण्यात आली. त्यानंतर माता सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रा. सुषमा अंधारे यांनी मनुस्मृति ही कशाची घातक आहे, हे सांगून ती बहुसंख्यांकाची हुकूमशाही असल्याचे स्पष्ट केले. मनुस्मृतीमुळे देशात कशी अराजकता निर्माण होऊ शकते, हे स्पष्ट केले. संविधानाने स्त्रियांची गुलामगिरी नष्ट केली तरीही या देशात सध्या पुरुषी वाहकतेमुळे पंचायत राजवटीतही स्त्री कशाप्रकारे गुलाम बनत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. भाजप हा पक्ष मनुस्मृतीचा वाहक असल्याने या पक्षापासून सर्वांनीच सावध व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा सिंधु कन्या प्रा. क्षमा दलवाई यांनी मनुस्मृतीच्या विरोधात असणारी ही लढाई म्हणजे 30 विरुद्ध 70 अशी असून मनुस्मृति ही मानव धर्मशास्त्र या गोंडस नावाने पुढे आणली जात आहे. याचा उल्लेख करून बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये महाड येथे मनुस्मृतीचे का दहन केले?, याची माहिती सांगून अठराशे वर्षांपूर्वी मौर्य साम्राज्यात ती अस्तित्वात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसत्ता बदलली की मनुस्मृतीचा पाया कसा घट्ट रोवला जातो हे त्यांनी सांगून येथील जल, जंगल, जमीन हीच मनुस्मृतीने हेरून कशाप्रकारे मनुस्मृती राबवली गेली, याची माहिती त्यांनी स्पष्ट केली. ब्रिटिशांनी या देशात जरी सत्ता भोगली असली तरी त्यांनी मनुस्मृतीला धक्का न लावता आपला कारभार केला. मात्र त्यावर प्रहार करण्याचे काम भारतीय संविधानानेच प्रथम करून संविधान हीच मानवाची विकासाचा गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड असून्ता पारधे यांनी मनुस्मृतित सामाजिक न्यायाला बगल कशा प्रकारे दिली गेली हे सांगून संविधानामुळे माणसाना कशा प्रकारे सोयी सुविधा मिळाल्या, हे सांगून आरक्षणातून त्यांनी कशी प्रगती केली हे स्पष्ट केले. संविधान हेच जीवन समृद्ध करेल हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना संध्या गोखले याने संविधान हे मानव प्रगतीचे शास्त्र आहे. या संविधानामुळे स्त्री ,दलित, अल्पसंख्यांक या सगळ्यांना समानता मिळाल्याचे या देशात समता निर्माण झाल्याचे सांगून संविधान हाच जीवनाचा महानमंत्र असल्याचे स्पष्ट केले . संविधानाचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनी संघटित होणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर यांनी कोणताही कार्यक्रम संख्येवर अवलंबून नसून तो गुणवत्तेवर अवलंबून असल्याचे सांगून संविधान प्रेमींनी हे संविधान टिकविण्यासाठी या चळवळीत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले व प्रथम सत्राचा समारोप केला.
दुपारच्या सत्रात कमलताई परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला . यामध्ये जिल्ह्यात विविध पडलेल्या घटना ज्यामध्ये दलित, महिला, अल्पसंख्यांक यांच्या विरोधात घडलेल्या घटनांचा परामर्श मान्यवरांनी घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ॲड. मनोज रावराणे, संध्या म्हात्रे, सुजाता गोठोस्कर , शीला पेंडुरकर, सत्यवान तेंडुलकर, दिपाली तेंडुलकर, प्रकाश चव्हाण , राजन कदम, श्री. गावडे , मोहन जाधव , विशाल जाधव इत्यादींनी चर्चेत भाग घेऊन जिल्ह्यातील विविध घटनांचा परामर्ष घेतला
त्यानंतर त्यावर विचार मंथन करण्यात आले. यानंतर सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी खालील मान्यवरांची समिती गठीत करण्यात आली. यामध्ये विशाल जाधव, सुदीप कांबळे , स्वाती तेली त्यांच्यासह सुविधा पेंडुरकर, अर्पिता मुंबरकर, डॉ. राजलक्ष्मी चिंडक-पाटील, पूनम गायकवाड , विनायक मिस्त्री, पी. एल. कदम, सरिता चव्हाण सत्यवान तेंडुलकर, दिपाली तेंडुलकर, सुरेश पवार, शैलजा कांबळे, राजेंद्र कदम, रुकसाना शेख, निलेश तिरोडकर ,संदीप निंबाळकर , प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, नितीन वाळके, रमेश जाधव इत्यादींची एक समिती निर्माण करण्यात आली व शेवटी नितीन वाळके यांनी आभार मानले.


