सावंतवाडी : “अरे, रात्री झोपताना मोबाईल उशाखाली किंवा अगदी जवळ ठेवून झोपू नकोस, धोकादायक असतं!” हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. काहीजण तर इतकं घाबरवतात की, उशाखाली मोबाईल ठेवल्याने त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मेंदूला धोका पोहोचतो आणि मृत्यूही ओढवू शकतो! पण यात खरंच तथ्य आहे का?
WHO आणि इतर मोठ्या संस्थांना मोबाईल फोनच्या रेडिएशनमुळे मेंदूला थेट गंभीर नुकसान होत असल्याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे, मोबाईल जवळ ठेवून झोपण्यात खरंच धोका आहे का नाही?
सध्या बहुतांश लोक मोबाईल फोनशी इतके जोडले गेले आहेत की ते झोपताना देखील मोबाईल आपल्या उशाशी ठेवतात. पण हा सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा आपल्या मेंदूवर आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने काय होतं?
1. सतत नोटिफिकेशन्स, वायब्रेशन किंवा लाईटमुळे मेंदू सतत अॅक्टिव्ह राहत असल्याने झोप पूर्णपणे होत नाही.
2. मोबाइल फोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, विशेषतः दीर्घकाळ मोबाईल जवळ ठेवल्यास.
3. झोपण्याआधी मोबाईल स्क्रीनकडे पाहिल्याने ‘ब्लू लाइट’ डोळ्यांवर ताण आणतो आणि झोपेच्या नैसर्गिक चक्रात अडथळा निर्माण होतो.
4. झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड, डिप्रेशन, चिंता यासारख्या मानसिक त्रासांची शक्यता वाढते.
5. काही घटनांमध्ये मोबाईल गरम होऊन स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे चार्जिंगवर असलेला मोबाईल उशाशी ठेवणं धोकादायक ठरू शकतं.
काय काळजी घ्याल?
त्यामुळे, जरी रेडिएशनचा मोठा बागुलबुवा खरा नसला तरी, शांत आणि सुरक्षित झोपेसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शक्य असल्यास, रात्री झोपताना मोबाईल तुमच्यापासून थोडा दूर ठेवा, उदाहरणार्थ बाजूच्या टेबलवर. तो उशाखाली किंवा कोणत्याही कापडाखाली, विशेषतः चार्जिंगला असताना, अजिबात ठेवू नका. झोपण्यापूर्वी काही वेळ मोबाईल न बघितल्यास शांत झोप लागण्यासही मदत होते.


