लखनौ : लखनौ सुपर जायंटस प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. सनरायजर्स हैदराबादनं 6 विकेटनं विजय मिळवत पराभवाची मालिका थांबवली. अभिषेक शर्मानं आक्रमक फलंदाजी करुन हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. लखनौ सुपर जायंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 बाद 205 धावा केल्या होत्या. हैदराबादनं 19 ओव्हरमध्येच ही धावसंख्या पूर्ण केली. हैदराबादसाठी अभिषेक शर्मानं अर्धशतक केलं.
लखनौच्या एकना स्टेडियममध्ये हैदराबादला विजयासाठी 206 धावांची आवश्यकता होती. हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. अथर्व तावडे 13 धावा करुन बाद झाला होता. मात्र, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्या 82 धावांच्या भागीदारीमुळं हैदराबादनं कमबॅक केलं. अभिषेक शर्मानं 59 धावा केल्या तर ईशान किशन 35 धावा केल्या. यानंतर हेनरिक क्लान आणि कामिंदू मेंडिसनं 55 धावांची भागीदारी करत हैदराबादला विजयापर्यंत पोहोचवलं.
लखनौला यंदाच्या आयपीएलमधील सातवा पराभव स्वीकारावा लागला. यामुळं लखनौ सुपर जायंटस प्लेऑफ च्या शर्यतीतून बाहेर पडलं आहे. आता प्लेऑफ साठी मुंबई आणि दिल्लीत स्पर्धा असेल. प्लेऑफमध्ये यापूर्वी गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दाखल झाले आहेत.