सावंतवाडी : पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रूर अतिरेक्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांचे नाहक बळी गेले.
आपल्या देशाच्या कर्तबगार तिन्हीही सुरक्षा दलानी ऑपेरेशन सिंधुर सारख्या धारदार हत्याराने पाकिस्तानी दुष्कृत्याला चोख प्रत्युतर देऊन चारी मुंड्या चित करून टाकलं व हे सगळ्या जगानं बघितलं आहे.
भारतीय तिन्हीही सैन्यदलाचे मनोबल वृद्धिंगत करणं आणि त्यांचा जाज्वल्य अभिमान व गौरव दृढतर करणं हे प्रत्येक स्वाभिमानी भारतीय नागरिकांच आध्य कर्तव्य आहे.
त्याचंच औचित्य साधून उद्या बुधवारी दिनांक २१/०५/२०२५ रोजी सावंतवाडी शहरातील गांधी चौक भारत माता हॉटेल येथून संध्याकाळी ठीक ४.०० वाजता सर्व पक्षीय, सामाजिक संस्था, व्यावसायिक असोसिएशन, विविध मंडळ आणि तमाम सुज्ञ जनतेच्या वतीने तिरंगा यात्रा आयोजित केलेली आहे.
सबब आपल्याला नम्रतापूर्वक कळविण्यात येत आहे की, आपण आपले सहकारी, हितचिंतक व मित्रमंडळी यांच्या सहित सदर वेळी व ठिकाणी उपस्थित राहून उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन उपकृत करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


