मुंबई : मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मान्सून पुढील २४ तासांत केरळमध्ये दाखल होणार आहे. तब्बल १६ वर्षांनंतर मान्सून केरळमध्ये इतक्या लवकर दाखल होत आहे. यापूर्वी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जून रोजी होते. १९१८ मध्ये सर्वात लवकर ११ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. तसेच सर्वात उशिरा १९७२ मध्ये केरळमध्ये मान्सून आला होता. त्यावर्षी १८ जून रोजी मान्सून सुरु झाला होता. मागील २५ वर्षांचा विचार केल्यास मान्सून सर्वात उशिराने ९ जून रोजी केरळमध्ये आला होता.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ ते ४८ तासांत मान्सून केरळमध्ये पोहचणार आहे. त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. आयएमडीच्या आधीच्या अंदाजानुसार २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार होता. म्हणजेच चार दिवस आधी मान्सून दाखल होणार होता. मागील वर्षी केरळमध्ये ३० मे रोजी मान्सून आला होता. यंदा देशभरात पाऊस सरासरी आणि सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
केरळ व्यतिरिक्त दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर आणि ईशान्य राज्यांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे सरकरणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तसेच सध्या दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. आता येत्या ३६ तासांत हा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे पश्चिमेकडून काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
देशात मान्सूचा परिणाम शेतीवर होत असतो. मान्सून वेळवर झाल्यास देशातील कृषी क्षेत्राचे उत्पादन चांगले येते. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मान्सून महत्वाचा ठरतो. धरणातील जलसाठ्यात वाढ होत असल्याने पाणी टंचाईचे संकटही दूर होते.


