मुंबई : रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा ६ जून रोजी साजरा केला जातो. परंतु ही पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असे वक्तव्य नुकतेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले होते. त्यांना शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. भिडे गुरुजी ज्येष्ठ आहे, मात्र त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय ? असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे, असे गंगाधर काळकुटे यांनी सांगत ६ जून रोजीच शिवराज्याभिषक सोहळा होणार असल्याचे सांगितले.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी सांगितले की, यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. त्यासाठी राज्यभरातून गावागावातून उत्साहाने मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवप्रेमी जमणार आहेत. ६ जूनलाच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यामुळे या तारखेलाच हा सोहळा होणार आहे.
जरी कोणी काहीही म्हणत असेल सोहळा रद्द केला पाहिजे किंवा काही…पण सोहळा तारखेनुसारच होईल, असे गंगाधर काळकुटे यांनी सांगितले. ते म्हणाले, यंदाही लाखोच्या संख्येने शिवभक्त गडावर येणार आहेत. भिडे गुरुजी ज्येष्ठ आहेत. मात्र त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय ?, असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. शिवभक्त आणि महाराष्ट्रातील रणरागिणी बांगड्याचा आहेर भिडे गुरुजींना पाठवून या वक्तव्याचा निषेध करतील, असे त्यांनी म्हटले.
वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरही काळकुटे यांनी आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंचीपेक्षा वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाची उंची जास्त असली पाहिजे का? त्याचे आत्मचिंतन केले पाहिजे. वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात आम्ही कुठेही इतिहासात वाचलेले नाही. वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवायचे की नाही, हा वाद निरर्थक आहेत. त्यासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमावी. त्या समितीने वाघ्या कुत्र्याचे शिल्प काल्पनिक असेल, असा निष्कर्ष काढला तर ती काढली पाहिजे. तसेच वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढायचे नसेल तर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पायथ्याला असली पाहिजे. महाराजांच्या समाधी पेक्षा जास्त उंची म्हणजे शिवाजी महाराजांचा एक अपमान आहे, असे शिवभक्तांना वाटते, असे गंगाधर काळकुटे यांनी म्हटले.


