पुणे : वैष्णवी हगवणेपूर्वी आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने, प्रियांका अभिषेक उमरगेरकरने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना 2022मध्ये घडली होती. प्रियांका ही पिंपरी-चिंचवडमधील नगरसेविका कमल घोलप यांची कन्या होती. घरगुती कारणातून प्रियांकाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. आता वैष्णवी हगवणेने देखील सासरच्यांचा छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्यानंतर प्रियांका घोलपच्या कुटुंबीयांनी खळबळजनक खुलासा केला आहे.
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र,प्रकरण जेव्हा न्यायालयात जाईल तेव्हा त्यांनाही तारीख पे तारीख म्हणत न्यायासाठी वर्षानुवर्षे खेटाच माराव्या लागतील असा संताप प्रियांका खोलपच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
2022 मध्ये प्रियांकाच्या आई वडिलांनी तिचा विवाह मोठ्या थाटा माटात केला होता. दिल्या घरी आपली मुलगी सुखी राहावी म्हणून मागेल ती गोष्ट हुंडा म्हणूनही दिली. अगदी BMW कार आणि लाखो रुपयांच सोनं देखील हुंड्यात दिलं. मात्र लग्नाच्या आठ महिन्यानंतर सासरच्यांनी त्यांच्या घरचे फर्निचर करण्यासाठी तगादा लावला. ते फर्निचर करून देण्यासाठी प्रियंकाच्या आई वडिलांना थोडा वेळ लागला. दरम्यान, प्रियांकाचा सासरच्या मंडळीनी जास्त छळ केला आणि तिचा बळी घेतल्याचा आरोप आई वडिलांनी केला. प्रियांकाच्या आत्महत्याचं प्रकरण पोलिसात गेलं त्यांनी आरोपी सासू, सासरा आणि पतीला अटक देखील केलं. तीनही आरोपींची जेलमध्ये रवानगी झाली. मात्र कायद्यातील तरतुदीनुसार तीन महिने जेलमध्ये गेल्यानंतर तीनही आरोपी आज जामिनावर बाहेर आहेत. घटनेला तीन वर्ष उलटली आहेत. मात्र प्रियांकाच्या कुटुंबीयांना ना आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? या प्रश्नाच उत्तर मिळालंय, ना आरोपींना कठोर शिक्षा झाली. उलट या तीन वर्षात अनेक पुरावे नष्ट केल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘वैष्णवीच्या कुटुंबियांवर देखील अशीच वेळ येईल आणि असं होऊ नये हे शासनाला वाटत असेल तर, हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना मृत्यू दंड किंवा आजन्म कारवासा सारखी शिक्षा देण्याची तरतूद करायलाच हवी हे जो पर्यंत होणार नाही तो पर्यंत वैष्णवी किंवा प्रियंकासारख्या अनेकांना न्याय मिळणार नाही. तसेच हुंडाबळीचे प्रकार देखील थांबणार नाहीत,’ अस प्रियांकाच्या आई वडिलांनी म्हटलंय.


