नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरुद्ध सुरु असणारा पोकसो खटला बंद करण्याचा निर्णय पटियाला हाऊस कोर्टाने घेतला आहे. माहितीनुसार, पोलिसांनी 15 जून 2023 रोजीच या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केली होती. आता क्लोजर रिपोर्ट पटियाला हाऊस कोर्टाने स्वीकारला असून बृजभूषण सिंग यांच्याविरोधात सुरु असणारा पोकसो खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुनावणीदरम्यान, तक्रारदाराने पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध केला नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे 1 ऑगस्ट 2023 रोजी या प्रकरणातील पोलिस रिपोर्टवर तक्रारदाराने कोणतेही आक्षेप घेतले नव्हते आणि पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले होते. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बृजभूषण शरण सिंग यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
तर यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टाने भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या पोकसो प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर तक्रारदार महिला कुस्तीगीरला नोटीस बजावली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी तक्रारदार महिला कुस्तीगीराला 26 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
ब्रिजभूषण शरण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून कैसरगंज येथून सहा वेळा खासदार होते. ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांची राजकीय कारकीर्द अनेक वादांनी भरलेली आहे.


