पुणे : पुण्यातील विवाहित तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, पती शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे. वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद हे न्यायालयीन कोठडीत आहेत तर वैष्णवीचा सासरा आणि दीर हे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान वैष्णवीचा पती शशांक हगवणेवर पोलिसांनी आता आणखी एका प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केला आहे. प्रशांत येळवंडे यांची शशांक आणि त्याची आई लता हगवणे यांनी जेसीबी विक्रीच्या नावाखाली फसवणूक केली होती. ऍडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेले 11 लाख 70 हजार रुपये हगवणेंनी परत केले नाहीत. उलट प्रशांत येळवंडे यांनाच धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी हगवणेच्या घरातून जेसीबी जप्त केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण –
वैष्णवीचा पती शशांक हगवणे याने जेसीबीच्या व्यवहारामध्ये प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 25 लाखांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला होता, समोर आलेल्या माहितीनुसार प्रशांत येळवंडे यांनी शशांकला सुरुवातील पाच लाख रुपये दिले होते, त्यानंतर ते दर महिन्याला जेसीबीचा हाफ्ता भरण्यासाठी त्याला पन्नास हजार देत होते, मात्र शशांकने बँकेचा हाफ्ता भरला नाही, त्यामुळे बँकेनं जेसीबी जप्त केला, शशांकने जेसीबी सोडवला मात्र या प्रकरणात आपली 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केला होता, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आता हा जेसीबी जप्त केला आहे.
निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची चौकशी –
दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी नेपाळमधून अटक केलं होतं, त्याचं पहिलं लोकेशन त्याच्या एका घटस्फोटीत मैत्रिणीमुळे मिळाल्याची माहिती समोर येत आहे, या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या मौत्रीणीची चौकशी केली, मात्र या प्रकरणाशी निलेशच्या मैत्रिणीचा संबंध नसल्याने तिला सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


