मुंबई : यंदा देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून तब्बल 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील दोन दिवस पूर्वोत्तर, उत्तर-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भारतामधील वीस राज्यांना आयएमडीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, वादळ देखील झोडपून काढणार असून, या काळात वाऱ्याचा वेग ताशी 70 किलोमीटर इतका प्रचंड राहण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार एक जूनपासून आसाम, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, याच काळात अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे, या पार्श्वभूमीवर या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या काळात हवेचा वेग हा 40 ते 70 किमी प्रति तास इतका राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये या राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये आजपासून ते चार जूनपर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पंजाब आणि हरियाणामध्ये तीन जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील चार दिवस या राज्यांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. बिहारमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


