पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. तिनं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात असलं तरी तिचा खून करण्यात आला आहे, असा दावा केला जातोय. असे असतानाच आता वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तिच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. या एका कामामुळे आता वैष्णवीच्या मृत्यूचं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे.
नेमकं काय होणार?
मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्यासाठी पोलीस पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. तिच्या मृत्यूच्या कारणाच्या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. वैष्णवीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती, असे सांगितले जाते. त्यामुळे तिने ज्या पंख्याच्या मदतीने कथितपणे स्वत:ला संपवले होते, त्याच पंख्याच्य माध्यमातून तिच्या मृत्यूच्या कारणापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
पंख्याची होणार फॉरेन्सिक चाचणी –
मिळालेल्या माहितीनुसार आता वैष्णवी हगवणेने ज्या पंख्याला गळफास लावून कथितपणे स्वत:ला संपवले होते, त्याच पंख्याची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे. वैष्णवीचे वजन किती आणि घराच्या छताला लावलेला पंखा किती वजन पेलू शकतो, याचा ताळमेळ लावला जाणार आहे. फॉरेन्सिक चाचणीतून फॅन वैष्णवीच्या वजनाइतका भार पेलू शकतो का? हे स्पष्ट होणार आहे.
वैष्णवी दुसऱ्या एका मुलासोबत बोलत असल्याचा दावा –
दरम्यान, वैष्णवी हगवणेचे आत्महत्या प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी चालू आहे. वैष्णवी दुसऱ्या एका मुलाला बोलत होती. त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. आम्ही याबाबत वैष्णवीच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. याच उद्ग्विग्नतेतून तिने आत्महत्या केली असावी असा युक्तिवाद हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केला आहे. तर हगवणे कुटुंबाने याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना दिलेली नाही. काहीही सांगितलेलं नाही, असं वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. आता आगामी सुनावणीत नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


