- एकूण ७० कथांमधून महावीर कांबळे यांच्या ‘मोर्चा’ कथेची पुरस्कारासाठी निवड.
- कणकवली : गुणवत्ता असणाऱ्या कथाकारांना प्रेरणा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गच्या कथा पुरस्कार योजनेत २०२५ चा बाबुराव बागुल कथा पुरस्कार इचलकरंजी येथील कथाकार महावीर कांबळे यांच्या ‘ मोर्चा’ या कथेने प्राप्त केला आहे. समीक्षक प्रा. डॉ.रमेश साळुंखे यांनी परीक्षण केलेल्या या कथा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण 70 कथाकार सहभागी झाले होते.
सम्यक संबोधी संस्था वेगवेगळे साहित्यिक उपक्रम राबवत असते.या पार्श्वभूमीवर मराठीतील नव्या उत्तम कथाकाराचा शोध घेण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.ही कथा स्पर्धा सर्वांसाठी खुली होती. या कथा स्पर्धेसाठी एकूण ७० कथाकारांनी आपल्या कथा पाठविल्या होत्या. या कथांमधून महावीर कांबळे यांच्या मोर्चा या उत्कृष्ट कथेची बाबुराव बागुल कथा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दोन हजार (२००००) रुपये, स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप असून जुलैमध्ये कणकवली येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभ सोहळ्यात सदर पुरस्काराने महावीर कांबळे यांना गौरविण्यात येणार आहे.
महावीर कांबळे हे कविता कादंबरी कथा आधी साहित्य प्रकारात लेखन करत असून मोर्चा या कथेत त्यांनी व्यवस्थेची उलट तपासणी केली आहे. कवी कथेची बांधणी आणि कथेचा सशक्त आशय या निकषावर त्यांची बाबुराव बागुल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे परीक्षकांनी म्हटले आहे.दरम्यान बाबुराव बागुल कथा पुरस्कारासाठी बाबुराव बागुल कुटुंबातर्फे सम्यक संबोधी साहित्य संस्थेला प्रोत्साहित करण्यात आले आहे. बाबुराव बागुल यांनी मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. त्यांच्या परिवर्तन साहित्य विचाराचा प्रभाव कायम राहावा आणि याद्वारे त्यांचे कायम स्मरणही व्हावे या हेतूने त्यांच्या नावाने हा कथा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. अशी माहिती सम्यक संबोधी संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांनी दिली.


