नमस्कार वाचक मित्रहो,
मंडळी,
सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये मध्यान्ह भोजन व्यवस्था नीट राबवली जाते का ?
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित करता येईल ?
विज्ञान शिक्षकांना येणाऱ्या अडचणीचा अभ्यास
शिक्षकांच्या अध्यापन परिणामकारकतेचा अभ्यास
अशा प्रकारचे विषय बहुतेक सर्वच विद्यापीठातील शिक्षण शास्त्र विभागामध्ये होत असतात वास्तविक पाहता या संशोधनाच्या निष्कर्षांचा उपयोग महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाला शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व्हायला हवा . सोलापूर विद्यापीठाचा विचार केला तरी साधारणपणे दरवर्षी किमान 25 ते 30 विद्यार्थी शिक्षण शास्त्र विषयासाठी पीएच .डी संशोधनासाठी नाव नोंदवत असतात आणि साधारणपणे एवढेच विद्यार्थी प्रत्येक विद्यापीठात संशोधन करतात असे मानले तर 200 ते 250 विद्यार्थी दरवर्षी शिक्षण शास्त्रामध्ये पीएच .डी दर्जाचे संशोधन करत आहेत . आता या दर्जाच्या संशोधनाचे निष्कर्ष कोण वाचतो आणि याचा उपयोग कोणाला कसा होतो हे एक गौड बंगाल आहे .
वास्तविक पीएच .डी पदवीसाठी संशोधन करण्यासाठी लागणारे बौद्धिक श्रम , वेळ व पैसा लक्षात घेता या संशोध नाचा समाजाला उपयोग व्हायलाच हवा . पण आपल्याकडे अशी काही तरतूद नाही .महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग , एस .एस .सी . बोर्ड , बालभारती , यांनी सातत्याने शिक्षणाच्या गुणवत्ता
वर्धनाचा विचार करावा अशी अपेक्षा आहे . त्या दृष्टीने या संस्था काम ही करतात परंतु त्यामध्ये बालभारती वगळता कोणीही संशोधनाचा आधार घेऊन काम करीत नाही . एस .सी .ई .आर .टी . ( महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ) या नावातच खरे तर संशोधन सामावलेले आहे .परंतु या संस्थेत कोणत्याही प्रकारचे संशोधन होत नाही . केवळ एन .सी .ई .आर .टी .ने पाठवलेल्या दस्तावेजांचे मराठीकरण करणे हेच आपले काम आहे अशी भूमिका असल्याचे दिसते . बरे स्वतः ही संस्था किंवा एस .एस .सी . बोर्ड स्वतः संशोधन करीत नाहीत . निदान मग यांनी किमान महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील शिक्षण शास्त्र विभागात होत असलेल्या संशोधनाची तरी माहिती घ्यावी . यासाठी आपल्याच विभागात एखादा कक्ष स्थापन करावा व या संशोधनाच्या निष्कर्षांचे व शिफारशींचे विश्लेषण करून त्याआधारे शैक्षणिक निर्णय घेण्यासाठी शासनाला दिशा द्यावी . पूर्वी एस .सी .ईआर .टी .मध्ये संशोधन होत असे . परंतु अलीकडे या संस्थेला संशोधनाचा पूर्ण विसर पडलेला आहे . एस . सी .इ .आर . टी . मध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन व्हावे व या संशोधनास विद्यापीठांनी मान्यता द्यावी अशी काही व्यवस्था निर्माण व्हायला हवी . किंबहुना शिक्षणशास्त्र विषयात Ph.D करण्यासाठी विषय SCERT ने विद्यापीठांना कळवावेत .
शिक्षण व्यवस्थेमध्ये नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत . त्या प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय पद्धतीने शोधायला हवीत . अलीकडे शासन या संस्थांच्या सल्ल्याने काही निर्णय घेते , वर्तमानपत्रात काही उलट सुलट बातम्या येतात , आणि मग निर्णय फिरवला जातो .बऱ्याच वेळा तर केवळ शहरी त्यातील पुणे मुंबईच्या लोकांच्या विरोधामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतलेले निर्णय फिरवले जातात . पूर्वी एका शिक्षण मंत्र्यांनी चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवावे ,असा आग्रह धरला त्यावेळी ग्रामीण भागातील पालकांना तो योग्य वाटत होता . तरीही शहरी पालकांनी मुलांवर खूप ताण येईल म्हणून तो रद्द करायला लावला . एका शिक्षण मंत्र्यांनी वर्षातून पाच-सहा परीक्षा घ्याव्यात असे सुचवले , काही तज्ञांनी याला विरोध केला नंतर तो निर्णय मागे घेतला . अलीकडे पुस्तकात वह्याची पाने घालण्याचा निर्णय घेतला गेला तो मागे घेतला हे निर्णय योग्य होते की नाही हे माहीत नाही . हे निर्णय घेताना किंवा रद्द करताना काही संशोधन केले होते की नाही , हे महत्त्वाचे आहे . केवळ कोणाच्या तरी लहरी खातर निर्णय घेणे किंवा तो बदलणे हे योग्य नाही .ज्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या हितावर परिणाम होणार असेल तर असे निर्णय संशोधनाच्या आधारेच घ्यायला हवेत हे मात्र नक्की .
पूर्वी बालभारती पुस्तकां संदर्भात येणाऱ्या समस्या शास्त्रशुद्धरितीने सोडवण्यासाठी छोटी छोटी संशोधने करून घेत असे . एस .एस .सी . बोर्डात देखील संशोधन विभाग होता तो काय काम करत होता हे माहीत नाही . आता एक तर या संस्थांनी आपापले संशोधन विभाग क्रियाशील बनवावेत किंवा आपल्या समस्या या विद्यापीठांच्या शिक्षण शास्त्र विभागाकडे पाठवून त्यांच्याकडून संशोधन करून घ्यावे . अलीकडे गुगल फॉर्मच्या माध्यमातून काही चटकन निर्णय घेण्यासाठी लोकांकडून तज्ञांकडून मते मागविणे सोपे झाले आहे . त्याचाही उपयोग करायला हवा . जर आपण विद्यापीठात होणाऱ्या संशोधनाची काही दखलच घेणार नसू तर मग विद्यापीठात हे विभाग हवेत तरी कशाला ? मोठमोठ्या विद्वानांच्या बौद्धिक श्रमांचा हा केवळ अप व्यय आहे म्हणून यांचीही दखल शिक्षण विभागाने घ्यायलाच हवी.!
– डॉ .ह .ना .जगताप


