सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथील एका 12 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बालवयात सदर मुलाने केलेल्या या आत्महत्येमुळे वेत्ये पंचक्रोशीसह तालुक्यातील अनेकांना भावनिक बसला आहे. सदरची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील या बालकाने किरकोळ कारणावरुन घरातील छताच्या वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना त्याचा भाऊ व आईने बघताच एकच आरडाओरड केली आणि त्याला खाली उतरवले. तात्काळ गावातील ग्रामस्थांनी बेशुद्ध अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता या बालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
या घटनेनंतर सावंतवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला तसेच बालक अल्पवयीन असल्याने विशेष खबरदारी घेतली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले करीत आहेत. या घटनेनंतर वेत्ये गावात हळहळ व्यक्त होत आहे.


