मुंबई : अहमदाबाद येथील विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. संपूर्ण भारतभरातून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील मनसे या दु:खात सहभागी आहे, असं सांगितलं आहे. पण सोबतच राज ठाकरे यांनी डीजीसीएचा कारभार तसेच अपघातग्रस्त ड्रमलाईनर या विमानाबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी डीजीसएला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. जगभरात ड्रिमलाईनर या विमानांची उड्डाणं थांबवली जात असताना या विमानाला उड्डाण घेण्यास तसेच 40 हून अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर देण्यास सरकारने परवानगी का दिली ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली –
अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.


