मुंबई : 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताला हादरवलं होतं. विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया समोर येत होत्या. परंतु बॉलिवूड अभिनेता आमिर खान याविषयी गप्पा का होता, असाही चर्चेचा एक सूर उमटत होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरला याविषयी थेट प्रश्न विचारण्यात आला. “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अनेक सेलिब्रिटी संतप्त प्रतिक्रिया देत असताना तू काहीच का बोलला नाहीस”, असा सवाल आमिरला करण्यात आला होता. त्यावर त्याने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
आपली बाजू मांडताना आमिर म्हणाला, “आपल्या देशावर झालेला हा दहशतवादी हल्ला इतका घृणास्पद होता की, त्यात तुम्हाला त्यांचा भ्याडपणा दिसला असेल. आपल्या देशात घुसून ते सामान्य नागरिकांवर गोळ्या झाडत आहेत. त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याचा अर्थ काय आहे? मीसुद्धा यावर बोललो होतो. मुळात मी सोशल मीडियावर नाही. त्यामुळे काही घडलं की लोक अवघ्या काही सेकंदांमध्ये त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहितात. परंतु मी त्यावर बोललो होतो. जेव्हा मी एका कार्यक्रमात गेलो होतो, तिथे मला विचारण्यात आलं असता मी माझी प्रतिक्रिया स्पष्टपणे दिली होती. हा हल्ला केवळ आपल्या देशातील लोकांवर नाही, तर आपल्या देशाच्या एकतेवर झालेला हल्ला आहे. ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. त्यासाठी त्या दहशतवाद्यांना चोख उत्तर भारताकडून मिळालं आहे.”
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असताना तुर्कस्तानने पाकिस्तानला चिथावणी मिळेल अशी कृती केली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांना भारतीय सैन्याने लक्ष्य केलं. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील राज्यांवर ड्रोन हल्ले केले. या तणावादरम्यान तुर्कस्तानने पाकिस्तानची मदत केली होती. यानंतर सोशल मीडियावर बॉयकॉट तुर्कीची मोहीम सुरू झाली होती. त्याच दरम्यान आमिरचे काही फोटो चर्चेत आले होतो. या फोटोंमध्ये तो तुर्कीच्या फर्स्ट लेडीची भेट घेतल्याचं पहायला मिळालं होतं. या फोटोंबाबतही आमिरला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नावर आमीर म्हणाला, “तुर्कीने खूप चुकीचं केलं आणि प्रत्येक भारतीयाला ठेच लागली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या देशात भूकंप आला तेव्हा सर्वांत आधी भारतानेच त्यांची मदत केली होती. त्यावेळी आपल्या सरकारला माहीतसुद्धा नव्हतं की तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन दिले आहेत. मलासुद्धा हे माहीत नव्हतं. जेव्हा मी तुर्कीमध्ये फर्स्ट लेडीची भेट घेतली होती, तेव्हा मलासुद्धा माहीत नव्हतं की सात वर्षांनंतर हा देश आपल्याशी असा वागेल. आपण त्यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता, त्यांची मदत केली होती. त्याबदल्यात त्यांनी पाकिस्तानची साथ देऊन आपल्याशी गद्दारी केली. हे खूप चुकीचं आहे.”
तुर्कीच्या फर्स्ट लेडीसोबत चहापानाच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाल्यावरून आमिर पुढे म्हणाला, “जेव्हा मी दुसऱ्या देशात जातो, तेव्हा मी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व तिथे करत असतो. त्यामुळे जर एखादी व्यक्ती चहापानासाठी बोलवत असेल, तर त्यांना नकार देणं चांगलं वाटत नाही. ही खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा मला तुर्कीविषयी फारशी माहिती नव्हती. आता त्यांनी पाकिस्तानला साथ दिल्यानंतर अनेकांनी तुर्कीच्या टूरिझमवर बहिष्कार टाकला आहे. हा योग्य निर्णय आहे. “


