जेरूसलेम : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही देशांकडून एकमेकांवर बॉम्बहल्ले, ड्रोनहल्ले केले जात आहेत. तसेच क्षेपणास्त्रेही डागली जात आहेत. असे असतानाच आता एक मोठी आणि गंभीर माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इराणने बॅलेस्टिक मिसाईल्सचा वापर करून इस्रायलचे पंतप्रधान बेजामीन नेतान्याहू यांचा कैसरिया व्हिला तसेच हदेरा उर्जा प्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जातोय. इस्रायलच्या लष्कराने तेहरान तसेच मंत्रालयावर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल ही मोठी कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. याआधी इस्रायलने शुक्रवारी (13 जून) इराणच्या अणूउर्जा प्रकल्पांवर तसेच इतर 100 पेक्षा अधिक जागांवर हल्ले केले. तेव्हापासून इराणही इस्रायलला चोख प्रत्युत्तर देत आहे.

आता हा संघर्ष रोज वाढतच जात आहे. दरम्यान, आता नेतान्याहू यांच्या कुटुंबाच्या व्हिलालाच लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)


