मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ‘लाडकी बहीण योजना’वर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1,500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार येतो.
दरम्यान, या योजनेवर आता सिनेमा येणार असून नृत्यांगणा गौतमी पाटील आणि ‘रात्रीस खेळ चाले फेम’ अण्णा नाईक या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. लाडकी बहीण योजनेवरील सिनेमात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्या अभिनयाच्या जोडीला रात्रीस खेळ चाले फेम लोकप्रिय अभिनेते अण्णा नाईक यांची दमदार साथ असणार आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ या उपक्रमावर आधारलेली ही कथा असणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिक बळकटी देण्यात आली असून, त्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. याच प्रेरणादायी योजनेवर हा चित्रपट भाष्य करणार आहे. नुकताच सातारा येथे या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला. यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, तसेच राजेंद्र मोहिते, अनंत काळे, महेश देशपांडे आणि तहसीलदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या योजनेचा फायदा लाखो महिलांनी घेतला असून, गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दिशेने ही योजना मोलाची ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालत प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. निर्मात्यांनी सांगितले की, “समाजोपयोगी विषयावर आधारलेला हा चित्रपट केवळ माहितीपर नसून, तो संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाने परिपूर्ण असा अनुभव देईल.” दिग्दर्शकांच्या मते, “एक गंभीर आणि समाजासाठी महत्त्वाचा विषय हलक्याफुलक्या शैलीत मांडत एक प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर उभी करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.”


