दोडामार्ग : गेल्या अनेक दिवसांपासून दोडामार्ग तालुक्यातील तळकट आणि परिसरातील गावांमध्ये हत्तींच्या कळपाने अक्षरशः थैमान घातले आहे. कळपातील हत्तींकडून शेतकऱ्यांच्या नारळ आणि सुपारीच्या बागायतींचे प्रचंड नुकसान होत असून, हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे. वनविभाग बैठका घेत असले तरी हत्तींना पकडण्याची मोहीम प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याबद्दल कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमधील संताप आणि निराशा वाढत आहे.
तळकट कोलझर हा निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो, पण सध्या याच निसर्गाचे एक रूप शेतकऱ्यांसाठी विनाशकारी ठरत आहे. अनेक दिवसांपासून हत्तींचा एक कळप या भागात स्थिरावला आहे. दिवसा शांत असणारे हे हत्ती रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांच्या बागायतींमध्ये शिरून होत्याचे नव्हते करत आहेत. मोठमोठी नारळाची आणि सुपारीची झाडे हत्ती सहजपणे भुईसपाट करत आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीने आणि मुलांप्रमाणे जपलेल्या बागा डोळ्यादेखत उद्ध्वस्त होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. “काय करावं काहीच सुचत नाहीये. आयुष्यभराची कमाई डोळ्यासमोर मातीमोल होत आहे. रात्री जागून काढल्या तरी हत्तींच्या कळपासमोर आमचा टिकाव लागत नाही,” अशी हताश प्रतिक्रिया एका स्थानिक शेतकऱ्याने दिली.
हत्तींच्या या सततच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. नारळ आणि सुपारी ही या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या उपजीविकेची प्रमुख साधने आहेत. मात्र, हत्तींनी केलेल्या नुकसानीमुळे त्यांच्यासमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. बागायती पुन्हा उभ्या करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत शासन आणि वनविभाग सक्रिय झाल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात कृती मात्र शून्य आहे. हत्तींना पकडण्यासाठी आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडून सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे होत आहेत, चर्चा होत आहेत, पण या चर्चांमधून ठोस उपाययोजना कधी समोर येणार, याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. “रोज फक्त बैठका आणि चर्चा ऐकतोय, पण हत्तींना पकडायला कुणीच येत नाही. जोपर्यंत पकड मोहीम सुरू होत नाही, तोपर्यंत आमच्या बागा वाचणार नाहीत,” असा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.
एकीकडे हत्तींकडून होणारे प्रचंड नुकसान आणि दुसरीकडे प्रशासनाची उदासीनता, अशा दुहेरी संकटात तळकट परिसरातील शेतकरी सापडला आहे. आपली आयुष्यभराची मेहनत डोळ्यादेखत उद्ध्वस्त होताना पाहण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच उरलेले नाही. शासनाने केवळ बैठका न घेता तातडीने ‘हत्ती पकड मोहीम’ सुरू करून या संकटातून आमची सुटका करावी, अशी आर्त हाक इथला शेतकरी देत आहे.
हत्तींचा उच्छाद सुरूचं !, तळकटमध्ये शेतकरी हवालदिल ! ; अश्रूंच्या धारांत उद्ध्वस्त होतायत नारळ-सुपारीच्या बागा!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


