वैभववाडी :वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी, डीएलएलई व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. योग ही भारताने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनःशांती व निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम महत्त्वाचा आहे असे अध्यक्षीय भाषणात डॉ.एन.व्ही. गवळी यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, योग शिक्षक प्रा. एस. एन. पाटील उपस्थित होते. प्रा. एस. एन. पाटील यांनी योग व आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास, योगाचे महत्त्व, योग व प्राणायामाचे विविध प्रकार याबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिके सादर केली. योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनी निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी योगाचा नियमित सराव करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय पैठणे (एनएसएस विभाग प्रमुख) यांनी केले, तर प्रा. एस. आर. राजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम. करपे यांनी विशेष प्रयत्न केले.


