गेल्या तीस वर्षात महाराष्ट्रातील राजकारण हे फारच अस्थिर झालेले आहे. पूर्वी ते अस्थिर नव्हते असे नाही पण आजच्या एवढे नक्कीच नव्हते . व्यक्तीगत राजकीय महत्त्वकांक्षा, नेहमीच सत्तेच्या परिघात राहाण्याचा खटाटोप आणि आपल्या जिल्ह्यावर आपली राजकीय पकड कायम रहावी यासाठीची धडपड अशी अनेक कारणे असू शकतात. अर्थात काँग्रेसच्या काळात महाराष्ट्रातील अनेक कुटुंबानी वर्षानुवर्षे सत्तेवर आपली पकड कायम ठेवली. प. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात जसे काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते तोच प्रकार कोकणातही होता मात्र काही प्रमाणात समाजवादाचाही पगडा होता. अशावेळी १९९० च्या दशकात कणकवली तालुक्यातील वरवडे गावातील सुपुत्राने शिवसेनाप्रमुख हिंदूह्यदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने हातात सेनेचा भगवा आणि धनुष्यबाण घेऊन प्रवेश केला. मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक व बेस्ट समितीचे चेअरमन आणि बाळासाहेबांचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांचे पिताश्री, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे विद्यमान खासदार नारायणराव राणे यांनी कणकवली- मालवण या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिला सुरुंग लावून विधानसभा जिंकली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. नंतर १९९५ मध्ये युतीचे मंत्री,आणि शेवटच्या अवघ्या आठ महिन्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. स्व बाळासाहेब ठाकरे व स्व. प्रमोद महाजन या दोन मोठ्या नेत्यांच्या राजकीय रणनीतीमुळे महाराष्ट्रात सेना भाजपाची आलेली ती पहिली सत्ता.

मा. नारायणराव राणे यांचा हा राजकीय प्रवास सुरू असतानाच राणे यांचे धाकटे सुपूञ आणि या जिल्ह्य्याचे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे हे तेव्हा परदेशात लंडनला एम्. बी. ए. चे शिक्षण घेत होते. सेना भाजपची सत्ता गेली आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आले. तेव्हा नारायणराव हे विरोधी पक्षनेते होते. मातोश्री विशेषतः उध्वव ठाकरे यांच्याबरोबर राजकीय मतभेद झाले आणि २००५ मध्ये बाळासाहेबांचे कट्टर व विश्वासू शिवसैनिक नारायणराव राणे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करुन काँग्रेसचा हात पकडला. काँग्रेसमध्ये आले मंत्री झाले… आणि याच दरम्याने २००६ मध्ये राणे साहेबांच्या या कनिष्ठ सुपूञाने लंडन मधील आपले शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतले. काही महिने लोटल्यांनंतर नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात युवकांची फळी निर्माण केली. या युवा संघटनेची व्याप्ती वाढली. युवकांची सगळ्यात महत्त्वाची समस्या रोजगार. त्यासाठी महाराष्ट्रातील मोठ्या शहरात रोजगार मेळाव् घेऊन रोजगार निर्मितीचा प्रयत्न केला. इकडे दादा काँग्रेसमध्ये मंत्रीपदावर आपल्या पद्धतीने कार्यरत होते, तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे दूरदृष्टीने स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून स्वतः चा राजकीय स्पेस निर्माण करत होते. दादांचे आयुष्य हे शिवसेने सारख्या आक्रमक शैलीत काम करण्यात गेले. काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून धुसफूस सुरुच होती. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून नितेश राणे यांच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी काँग्रेसकडूनही दबाव येत होता तरीही नितेश राणे यांनी या दबावाला भिक घातली नाही.
२००९ मध्ये देवगड कणकवली या पुनर्रचना झालेल्या मतदारसंघातून दादांचे उजवे समजले जाणारे ठाणेचे नगरसेवक श्री रविंद्र फाटक यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेली जे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास आहेत. या निवडणुकीत फाटक यांचा भाजपाचे श्री प्रमोद जठार यांनी अवघ्या ३४ मतानी पराभव केला आणि स्व. आप्पासाहेब गोगटे यांचा हा गड नवख्या प्रमोद जठारानी राखला. खरे म्हणजे जठाराना ही लागलेली लाॅटरीच होती. जठार विरोधी पक्षाचे आमदार झाले मात्र याचवेळी २०१४ ची निवडणूक विचारात घेऊन नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून कुणाला कशाचाही पत्ता न लागता शांतपणे मतदारसंघ बांधायला सुरूवात केली. .. नितेश राणेंचा पराभव करण्यासाठी भाजपाने जठारांचे होमपिच कासार्डे येथे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भव्यदिव्य प्रचार सभा झाली पण मा. मोंदीच्या व भाजपाच्या झंझावातात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले नितेश राणे तब्बल बत्तीस हजारांच्या फरकाने विजयी झाले. या निवडणुकीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मा. पंतप्रधानांनी कणकवली प्रमाणेच इतर ज्या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या त्या ठिकाणचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले मात्र अपवाद राहिला तो कणकवलीचा. हा विजय काँग्रेस पक्षाचा नव्हता. हा विजय होता नितेश राणे यांनी आपल्या स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सूक्ष्म निवडणूक नियोजनाचा. मी तेव्हा जठारांच्या प्रचारात सक्रिय होतो.. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या प्रत्येक हालचालीवर स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांचे लक्ष होते हे मला अगदी गेल्यावर्षी माझ्या घरगुती कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला ओम गणेश बंगल्यावर गेलो होतो तेव्हा नितेश राणे यांनीच सांगितले.
नितेश राणे विरोधी पक्षाचे आमदार झाले. त्यामुळे सत्ताधारी म्हणून जो एक आवाज असतो आणि मतदारसंघाचा विकास निधी तसेच मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणे फार कठीण.
नारायणराव राणे यांचा मुंबई पोटनिवडणुकीत तसेच कुडाळ मतदारसंघत नवख्या वैभव नाईकांनी दोनवेळा केलेला पराभव तसेच नितेश राणे यांचे जेष्ठ बंधू विद्यमान आमदार निलेश राणे यांचा खासदारकिला झालेला पराभव याचे फार मोठे शल्य राणे कुटुंबियांना होतेच पण जास्त जखमा या नितेशला झाल्या होत्या. दादांनी काँग्रेसशी फारकत घेऊन आपला स्वतःचा स्वाभिमानी पक्ष काढला. तांत्रिक दृष्ट्या नितेश राणे काँग्रेसमध्ये होते. नवीन पक्ष काढणे व तो चालवणे या मर्यादा आणि दादांचे वाढते वय यामुळे काही दिवसातचं दादानी भाजपाचे कमळ हातात घेतले आणि केंद्रात मंत्री झाले. भाजपाने राज्यसभेवर संधी दिली. २०१९ च्या निवडणुकीत कणकवली या आपल्या हक्काच्या मतदारसंघात नितेश राणे भाजपाचे पुन्हा आमदार झाले त्यांनी त्यांचेच जुने सहकारी सेनेचे सतीश सावंत यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
केंद्रात दादा मंत्री, आणि महाराष्ट्रात उध्वव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार. अडीच वर्षे मातोश्री आणि राणे कुटुंबिय हा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिला व अनुभवला.
तत्कालीन मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिका टिप्पणी केल्यामुळे केंद्रीय मंत्री दादाना जेव्हा अटक झाली व दादाना जेवत असताना भर ताटावरून पोलीस अधिकाऱ्यांनी उठवल तेव्हा मिडियाला प्रतिक्रिया देताना आमदार नितेश राणे यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंची सगळी उत्तर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यावर दिली. तेव्हा ते म्हणाले होते, हे द्रूष्य मला सहन होत नव्हते पण मी संयमाने ही घटना माझ्या ह्रदयात एका विशेष कप्यात सेव करून ठेवली आहे योग्य वेळी हा कप्पा मी उघडणार आहे… मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी केलेले हे वक्तव्य आणि त्याचे राजकीय पडसाद आपण नंतर अनुभवले.
सहा महिन्यापूर्वी नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मस्य व बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून निवड झाली. ते शपथ घेत असताना मला १९९५ चा सेना भाजप मंत्रीमंडळाचा मुंबई येथील स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. प्रमोद महाजन अशा नेत्यांच्या उपस्थित झालेला शपथविधी आणि त्या सेना भाजपाच्या पहिल्या मंत्रीमंडळात महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून शपथ घेतानाचे दादा आठवले. तोच आवेश, तोच आत्मविश्वास आणि तोच कोकणी बाणा.. जो नागपूर येथे २०२४ मध्ये नारायणराव यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी शपथ घेताना जाणवला.
गेली सुमारे चार वर्षे नितेश राणे यांनी आक्रमक हिंदूत्ववाची हार्ड लाईन का स्विकारली? हा सर्वञ चर्चैचा विषय आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही हार्ड लाईन योग्य आहे का ❓यामुळे भविष्यात याचा राजकीय तोटा तर नितेश राणे यांना होणार नाही ना? अशी सार्वत्रिक चर्चा सुरू आहे. मग याचा विचार नितेश राणे यांनी केला नसेल का ❓अल्पसंख्याका बाबत केलेल्या एका वक्तव्या बाबत त्यांच्याच मतदारसंघातील एका अल्पसंख्याक मिञाने मला प्रत्यक्ष भेटून सांगितले की, “आम्ही, नितेश राणे यांचे फॅन आहोत. . . जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आमच्या त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. आणि विश्वास पण आहे मात्र आमच्या समाजा बाबत ते ज्या पद्धतीने व्यक्त होतात त्याबद्दल आमचे समाजबांधव नाराज आहेत”
अर्थात जो अल्पसंख्याक युवक मनापासून प्रेम करतो त्याच्या भावनांचा विचार नितेश जी यांनी करावा ही माझी त्यांना व्यक्तीगत विनंती. आपला धर्म, भारतीय संस्कृती, परंपरा याचा प्रत्येक भारतीयांना निश्चितच अभिमान आहे आणि तो असला पाहिजे. त्यांच्या हिंदुत्ववाच्या या हार्ड लाईनमुळे भविष्यात त्याचे नेमके त्यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होतील हे येणारा काळ ठरवेल. अर्थात ते समजण्या एवढे ते निश्चितच परिपक्व आहेत .
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या एका वेगळ्या शैलीत काम सुरू केले आहे ते पहाता जिल्ह्यात भविष्यात काहीतरी आश्वासक घडेल असा विश्वास या सिंधुदुर्गातील जनतेला वाटत आहे. कुणीही सत्तेवर असला तरी शंभर टक्के समस्या़चे निराकरण व अपेक्षापूर्ती होत नाही. पण पहिल्याच नियोजनाच्या बैठकीत तब्बल चारशे कोंटीची केलेली तरतूद असेल. गाव पातळीवर छोट्या मोठ्या समस्या निवारण करण्यासाठी तातडीने घेतलेले निर्णय असतील, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्यासाठीचा आग्रह असेल, समाजातील सर्व घटकांशी साधत असलेला सुसंवाद असेल, केंद्रीय स्तरावर काही मंञालयीन पातळीवर त्यांच्या मंञालयाशी निगडित प्रलंबित प्रश्र्नासाठी ते सातत्याने करत असलेले प्रयत्न असतील,हे गेल्या सहा महिन्यातील माझे निरीक्षण पहाता नितेश राणे यांच्याकडून एक सकारात्मक अपेक्षा करायला हरकत नाही. अर्थात त्यांच्या अवघ्या सहा महिन्यांच्या कार्यकाळाचे मुल्यांकन करणे जरा घाईचे होईल पण बापसे बेटा सवाई याची प्रचिती येते आहे हे निश्चित.
नितेशजी जेव्हा कधी मला भेटतात तेव्हा ते आवर्जून सांगतात, “पार्सेकर जी, आपल्या सारख्यांचे मला मार्गदर्शन हवे आहे”.. अर्थात नितेशजीना मार्गदर्शन करण्या एवढे किंवा सल्ला देण्याएवढे आम्ही मोठे नाहीत पण त्यांचा एक हितचिंतक म्हणून त्यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून बिरबल व राजाची एक बोधकथा सांगू इच्छितो.
राजाच्या दरबारात दोन सल्लागार नेमलेले असतात. त्यापैकी एक सल्लागार हा राजा चुकला तर स्पष्टपणे राजाची कान उघडणी करायचा. असा निर्णय घेतला तर त्याचे राज्यावर कसे दूरगामी परिणाम होणार.. वगैरे वगैरे.. पण दुसरा सल्लागार हा फक्त आणि फक्त राजाची स्तुतीच करायचा, गुणगान गायचा. एकदा या स्तुतीपाठक सल्लागाराला राजाने आपले गुपीत सांगून टाकले जे राज्याच्या शञूपक्षाला कळल्यावर त्या सल्लागाराला मोठा आर्थिक फायदा होणार होता. मात्र त्यापूर्वीच हुशार बिरबलाच्या ध्यानात ही गोष्ट आली आणि त्याने त्या सल्लागाराला देहदंडाची शिक्षा देण्यास भाग पाडले त्यामुळे राजाचे आणि राज्यांचे संभाव्य होणारे नुकसान टळले… आपणही आपल्या दरबारी आपल्या फक्त असे बिरबल पारखले पाहिजे याचे कारण लहानपणी आम्ही इसानपती मधून ज्या बोधकथा वाचल्या, चाणक्य नीती वाचली त्यानुसार आजच्या या गतिमान राजकीय व सामाजिक परिवर्तनात जनतेचा सेवक म्हणून काम करत असताना आपण अशा गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. आपला आज वाढदिवस. कमी वयात आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि आपले अनुभवी व कार्य कुशल प्रशासक पिताश्री आणि आमचे सर्वांचे लाडके दादा यांच्या पुण्याईमुळे आपणास संधी मिळालेली आहे. आपला एक मित्र म्हणून मला विश्वास आहे की आपण या संधीचे सोने करून आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्या्ला एका वेगळ्या उंचीवर न्याल यासाठी आपणास मनापासून शुभेच्छा!
- ॲड. नकुल पार्सेकर (संस्थापक अध्यक्ष, अटल प्रतिष्ठान.)
- https://youtu.be/RbYCfMKAmzk


