लीड्स : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या उपकर्णधार ऋषभ पंतने इतिहास रचला. सोमवारी (23 जून) त्याने इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा मान पटकावला. 93 वर्षांच्या भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात हे अभूतपूर्व यश आहे. पण, शतक केल्यानंतर पंत जास्त काळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 140 चेंडूत 118 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताकडे दुसऱ्या डावात 6 धावांची आघाडी होती. तर ऋषभ पंत आणि केएल राहुल या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऑलआऊट 364 धावा केल्या. अशाप्रकारे भारताने इंग्लंडसमोर हे आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किती विकेट्स घेतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये ‘हे’ पहिल्यांदाच असे घडले –
पंतने लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात 134 धावांची झुंजार खेळी खेळली, तर दुसऱ्या डावातही त्याने जबरदस्त शतक ठोकले. इंग्लंडमधील हे त्याचे एकूण चौथे कसोटी शतक ठरले आहे. विशेष म्हणजे या कसोटीत भारताकडून एकूण पाच शतके झळकली आहेत. पंतच्या दोन शतकांव्यतिरिक्त, यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनीही शतके झळकावली आहेत. तुम्हाला सांगतो की, भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाने एका कसोटी सामन्यात 5 शतके झळकावली आहेत.


