मुंबई : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास दोन दशकांनंतर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. महायुती सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लावलेले बॅनर्स विशेष चर्चेत आले आहेत. या मेळाव्याला शरद पवार आणि काँग्रेसच्या वतीनेही पाठिंबा असल्याचं बॅनर्सवरून दिसून येत आहे. ‘मराठीचा भव्य विजय मेळावा, आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा,’ असा बॅनरवर मजकूर आहे. मुलुंड टोलनाक्यावर असे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मराठीचा विजयी मेळावा साजरा करण्यासाठी तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधूंना एकत्र एका व्यासपीठावर पाहता येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही ठाकरे बंधु एकत्र येणार याची उत्सुकता आहे. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र विजयी मेळावा घेणार आहेत. हा विजयी मेळावा आज (5 जुलै) एन. एस. सी. आय. डोम वरळी इथं होणार आहे. या मेळाव्यापूर्वी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजीदेखील झाली.
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने त्याविरोधात पुकारण्यात आलेला मोर्चा रद्द झाला. मोर्चा रद्द झाल्यानंतर विजयी मेळावा घेण्याचं उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलं. याबाबत शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना फोन करून या मेळाव्यात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. याची माहिती स्वत: राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. हा विजयी मेळावा असला तरी त्यात कोणतंही पक्षीय लेबल लावायचं नाही, हा मराठी माणसाचा विजय आहे, त्यामुळे मेळावा मराठी माणसाचा आहे, असं ते म्हणाले.


