सावंतवाडी : आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे. त्या बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने त्यांच्या भावी आयुष्यासाठी दिशा दायक काम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम विकासासाठी भाजप पक्ष आणि आम्ही नेहमीच प्रयत्नशील असल्याचे मत भाजपा युवा नेते संदीप गावडे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री. गावडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सभापती तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक रवींद्र मडगावकर व मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यात व दशक्रोशीत विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणारे युवा नेते संदीप गावडे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशालेतील सुमारे १४० विद्यार्थ्यांना या वह्यांचे वितरण करण्यात आले. संदीप गावडे मित्रमंडळाच्या या समाजशील उपक्रमाबद्दल संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे व प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी आभार मानले.


