लंडन : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. इंग्लंडने टीम इंडियाला 193 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 62.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 58 रन्स केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला पाचव्या आणि अंतिम दिवशी लॉर्ड्समध्ये विजयासाठी आणखी 135 धावांची गरज आहे. तर इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या विजयापासून 6 विकेट्स दूर आहे. त्यामुळे आता पाचव्या दिवशी कोण मैदान मारणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
दुसऱ्या डावात इंग्लंडला गुंडाळलं –
इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानेही 387 धावा केल्या. त्यामुळे पहिला डाव बरोबरीत राहिला. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 ओव्हरमध्ये 2 धावा केल्या. त्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. टीम इंडियाने इंग्लंडला 200 धावांपर्यंतही पोहचू दिलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 62.1 ओव्हरमध्ये 192 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर नितीश कुमार रेड्डी आणि आकाश दीप या जोडीने इंग्लंडच्या 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
भारताचा दुसरा डाव –
इंग्लंडला 192 धावांवर गुंडाळल्याने टीम इंडियाला वनडेप्रमाणे 193 धावांचं आव्हान मिळालं. चौथ्या दिवसाचा किमान 20 षटकांचा खेळ बाकी होता. त्यामुळे खेळ संपेपर्यंत टीम इंडियाला जास्तीत जास्त धावा करुन विजय निश्चित करण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम सुरुवात केली.
जोफ्रा आर्चर याने दुसऱ्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला 5 धावांवर पहिला झटका दिला. जोफ्राने यशस्वीला भोपळाही फोडून दिला नाही. त्यानंतर केएल राहुल आणि करुन नायर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 36 धावा जोडल्या. त्यानंतर ब्रायडन कार्स याने करुण नायरला 14 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट करत माघारी परतवला. करुणला या डावात मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र करुणने इथेही निराशा केली.
करुणनंतर कर्णधार शुबमन गिल मैदानात आला. शुबमन आणि केएल या दोघांनी काही बॉल खेळून काढले. मात्र त्यानंतर इंग्लंडने टीम इंडियाला मोठा झटका दिला. कार्सने शुबमन गिल यालाही एलबीडब्ल्यू आऊट केलं. शुबमनने 6 धावा केल्या. तर कर्णधार बेन स्टोक्स याने आकाश दीप याला 1 धावेवर क्लिन बोल्ड करत टीम इंडियाला चौथा झटका दिला. यासह चौथ्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं.
केएल राहुल 33 धावांवर नाबाद परतला. केएलने 47 चेंडूत 6 चौकार ठोकले. तर आता पाचव्या दिवशी केएलची साथ देण्यासाठी उपकर्णधार ऋषभ पंत येऊ शकतो. केएल आणि पंत या जोडीवर मोठी जबाबदारी असणार आहे. पाचव्या दिवसातील सुरुवातीचा एक तास आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे पहिल्या 1 तासावरुन विजेता कोण ठरणार? हे स्पष्ट होऊ शकतं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.


