भारतीय बॅडमिंटन दिग्गज आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने पती पारुपल्ली कश्यपपासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. दोघांचेही डिसेंबर 2018 मध्ये लग्न झाले. सायना हिने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. सायनाची पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट करत सायना म्हणाली, “आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जातं. खूप विचारविनिमय केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, विकास आणि मानसिकरित्या स्वस्थ राहण्याला प्राथमिकता देत आहोत. स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी…!”
सायना पुढे म्हणाली, “आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल मी कृतज्ञ आहे. यावेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या भावनांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.” सध्या सायनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सायना नेहवाल – पारुपल्ली कश्यप
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद अकादमीमधून करीयरची सुरुवात केली. सायनाने ऑलिंपिक कांस्यपदक स्वतःच्या नावावर केला आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं, तर कश्यपने 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून बॅडमिंटन जगतात आपला ठसा उमटवला. कश्यप 2024 च्या सुरुवातीला त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीतून निवृत्त होईल.
35 वर्षीय सायना गेल्या एक वर्षापासून बॅडमिंटन कोर्टपासून दूर आहे. जून 2023 मध्ये सिंगापूर ओपनच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करल्यानंतर तिने एकही सामना खेळलेला नाही. 2023 च्या अखेरीस, सायनाने एका पॉडकास्टमध्ये तिच्या संधिवाताच्या समस्येबद्दल आणि निवृत्तीबद्दल उघडपणे सांगितलं.
बॅडमिंटन क्रांतीचा पाया बनली सायना
सायना नेहवाल ही भारतीय बॅडमिंटनचा प्रमुख चेहरा मानली जाते. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. एवढंच नाही तर, सायना BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू आहे.


