सावंतवाडी : डॉ. सुबोधन कशाळीकर यांच्या मातोश्रींचे दु:खद निधन झाले म्हणून त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जात होतो एवढ्यात माझे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते श्री पुंडलिक दळवी मला म्हणाले, “एक अतिशय वाईट बातमी आहे, विकासभाई गेले” या बातमीवर माझा विश्वास नव्हता. सुबोधनच्या आईच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन आम्ही दोघे माझ्या घराच्या शेजारी असणाऱ्या चितारी हाॅस्पिटलमध्ये गेलो. काही निवडक लोकच तेथे होते. तेथे उपस्थितीत असलेले श्री मनोज नाईक व त्यांचे पिताश्री व विकास भाईंचे विश्वासू श्री सि. एल. नाईक मला म्हणाले, ” वकील साहेब, पोस्टमॉर्टेम करायला पाहिजे का?, मी त्यांना म्हणालो, की भविष्यात काही कायदेशीर अडचणी येवू नयेत तर केलेले चांगले.. यावरून दुर्दैवाने त्या अतिशय मनाला वेदना देणाऱ्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले.
त्या गाडीत सदैव हसतमुख असलेल्या भाईंचा चेहरा आज अगदी निस्तेज दिसत होता.. एकवेळ भाबडी आशा वाटत होती, की भाई उठतील आणि विचारतील, ” नकुल जी, आज कोणता इपिसोड… पण नाही आता ते शक्य नव्हते.. भाई अशा प्रवासाला निघाले होते की परतीचे सर्व मार्ग कायमचे बंद करून.
मी सावंतवाडीत आल्यापासून स्व भारतीताई,विकासभाईंची मोठी बहीण जीचे एक वर्षापूर्वीच निधन झाले. दुसरा भाऊ वसंत उर्फ अण्णा आणि तिसरा प्रसाद जो मुंबईला असतो.. आणि विकासभाई या चारही भावंडांशी माझा स्नेहबंध. गेल्या पंधरा वर्षापासून तर मी विकासभाईंशी खूपच जोडला गेलो. याचे कारण विकासभाई हे शांत, संयमी, स्थितप्रज्ञ, अभ्यासू व्यक्तीमत्व. अगदी थोडक्यात वर्णन करायचे तर, अगदी अथांग सागरा सारखे.. भरती आली म्हणून कधी गर्व नाही आणि ओहोटी आली म्हणून निराश नाही. सहकार, राजकारण, समाजकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील एक चालता बोलता ज्ञानकोश.
तळ्याकाठच्या त्यांच्या शाळेच्या पटांगणावर अनेकदा तासनतास आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पण मी जायचो. वेगवेगळ्या विषयांवर खूप चर्चा व्हायची पण या चर्चेत ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्या बद्दल कधीच टिका करत नसत. २० जूनला त्यांचा वाढदिवस साजरा झाला. सुपूञ विक्रांत याच्या आग्रहामुळे तब्बल दोन तास उशिरा गेल्यावरही मला सन्मानाने व्यासपीठावर घेतले.. तेव्हा मी बोलताना म्हणालो होतो, आज मला भाईंची तब्बेत ठणठणीत वाटतेय. आनंद झाला. जेष्ठ वकील आदरणीय दिलीप नार्वेकरांची शंभरी आणि विकासभाईंची पच्चाहत्तरी आपण एकञ साजरी करूया.. पण दुर्दैवाने त्यांचा वाढदिवस साजरा करुन आज फक्त पंचवीस दिवसपण झाले नाहीत आणि भाईनी आमचा कायमचा निरोप घेतला. राजकीय पुनर्वसनासाठी आलेल्या संधीवर लाथ मारून काँग्रेस पक्षाशी अखेरपर्यंत निष्ठा ठेवणारे विकासभाई हे अपवाद आहेत.
भाईंच्या अनेक आठवणी आहेत. सार्वजनिक जीवनात माणूस म्हणून वावरताना पक्ष, विचारधारा, जात, धर्म यापलीकडे एक माणूसकीचे एक जग असत आणि या जगात विकासभाई नेहमीच हसत खेळत वावरत. तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज भरला होता. जेव्हा पॅनेल करण्याचा निर्णय झाला तेव्हा विकासभाई माझ्यासाठी खूप आग्रही होते. मा. अजित पवार यांनी त्यांना विचारले होते की, नकुल पार्सेकर हे सध्या कोणत्या पक्षाचे काम करतात? त्यावर विकासभाई म्हणाले, कि ते सामाजिक काम करतात आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या ते खूप जवळचे आहेत.. दादांनी माझ्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला होता.. आणि हे मला विकासभाईनी राञी बारा वाजता फोन करून सांगितले. स्थानिक राजकारणामुळे जेव्हा ते शक्य झाले नाही तेव्हा मला पहिला फोन करून समजूत काढणारे विकासभाईच होते.
सुमारे चार वर्षापूर्वी जेव्हा त्यांचे सुपूञ राजकारणात सक्रिय होणार होता, तेव्हा त्याला विकासभाईनी सल्ला दिला होता की, मातोश्रीवर जावून प्रवेश करण्यापूर्वी जरा नकुल काकांना भेटून त्यांचे आशिर्वाद आणि सल्ला घे. विक्रांत माझ्या माजगाव येथील घरी आला होता. त्याला तुझ्या राजकीय प्रवासातील स्पीड ब्रेकर कोण असतील? त्यामुळे तुला हा प्रवास कसा कठीण जाईल हे मी सांगितले होते.. आणि विक्रांतला जेव्हा याचा अनुभव आला आणि राजकारणा पासून थोडा लांब गेला. त्यानंतर आम्ही तिघेही एकञ आलो तेव्हा या विषयाची पुन्हा चर्चा झाली होती. माणसे ओळखणे ही भाईंची खासियत.
दुर्दैवाने, आमच्या या अजातशत्रू विकास भाईंच्यावर अनेक प्रसंग आले. असे आघात पचवणे फारच कठीण पण भाईनी या सगळ्या आघातावर मात केली. याचे कारण गेल्या दहा वर्षांपासून शाळा आणि शाळेचा विकास हाच त्यांचा ध्यास होता. तळ्याकाठची शिक्षण नगरी ही खऱ्या अर्थाने “विकास नगरी ” केली. यामागे दुरद्रूष्टी आणि अथक प्रयत्न. यामध्ये त्यानी आपले मन रमवले.त्यानंतर आठ वर्षापूर्वी विक्रांतला मुलगा झाला .. कबीर, हा नातू म्हणजे भाई़चा आॅक्सीजन. दुर्दैवाने दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी विक्रांत च्या बायकोचे निधन झाले. छोट्या मुलीला मागे सोडून ती अभागी कायमची निघून गेली. नियती तरी किती निष्ठूर. विक्रांत आणि विकासभाईंवर दु:खाचा डोंगरच कोसळला. अशावेळी भाईंची एक एक दुखणी सुरू झाली. ह्यदय विकाराचा झटका, अर्धांगवायू यामुळे गेली दोन वर्षे भाई या गंभीर आजारांशी झुंजत होते.. पण अशाही परिस्थितीत आपला नातू कबीर आणि शाळा ही त्यांची खरी उर्जा असल्याने मोठ्या उमेदीने पुन्हा उभे रहात होते.
गेल्यावर्षी माझे मिञ डॉ. राजेश नवांगुळ यांच्या यशराज हाॅस्पिटलमध्ये आव्हीएफ् या नवीन सुविधेचे उदघाटन करायचे होते त्याचे निमंत्रण देण्यासाठी मी व नवांगुळ त्यांच्या घरी गेलो. ते आणि त्यांचा नातू दोघेचं होते. राञीची वेळ. भाईंशी परिस्थिती अतिशय गंभीर होती. एकही शब्द तोंडातून बाहेर पडत नव्हता. उभ रहायला जमत नव्हते. आम्ही गांभीर्य ओळखून त्यांना सुरूवातीला नवांगुळाकडे अॅडमिट करण्याचे ठरवले. गेली काही वर्षे त्यांच्या पाठिशी अगदी सावली म्हणून असणारे त्यांचे आतेभाऊ अमोल सावंत आले. आम्ही त्याना अॅडमिट केले. सोनोग्राफी केल्यावर समजले की बरगड्यामध्ये पाणी झालेले आहे. डॉ. नवांगुळानी तातडीने डॉ. जी. टी. राणे यांना फोन केला व पुढचे उपचार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी डॉ. जी. टी. राणे यांचा मला फोन आला Now he is ok.
शाळा हाच त्यांचा ध्यास व श्वास होता. अगदी अशाही अवस्थेत ते स्वतः गाडी चालवत शाळेत येत असत. वीस जूनला त्यांची आणि माझी अखेरची भेट. सुमारे अर्धा तास त्यानी खणखणीत आवाजात संबोधित केले. मी त्यांना म्हणालो, भाई आज मला तुमची तब्बेत अगदी ठणठणीत वाटली, यावर नेहमीप्रमाणे ते छान हसले. ते हास्य शेवटचे असेल असे स्वप्नातही वाटले नाही. मी निरोप घेताना म्हणाले, ” नकुल जी, मी आणि व्हिक्टर डान्टस दोघेही पावसाळ्यात तुमच्या घरी येणार.. आता असा कोणताही पावसाळा कधीच येणार नाही… ज्या पावसाळ्यात भाई माझ्या घरी येणार आहेत.. आठवणी खूप आहेत.. नियतीने माझे मार्गदर्शक, मला सतत प्रेरणा देणारे, माझी प्रत्येक फेसबुक पोस्ट लाईक करणारे आणि विविध क्षेत्रातील भरपूर माहिती देणारे अजातशत्रू मिञ आज हिरावून नेले. भाई , भावपूर्ण आदरांजली.. ‘कधीतरी आठवण आली की, आपणहून फोन करणारे भाई.. आता कधीच फोन करणार नाहीत..!
स्व. विकासभाई सावंत यांना भावपूर्ण आदरांजली..!
– ॲड. नकुल पार्सेकर.


