प्रासंगिक –
प्रत्येक दिवस हा विशेष असतो. आम्ही शाळेत असताना आमचे गुरूजी किंवा बाई वर्गातील फलकावर ” दिनविशेष ” लिहायला सांगत, आणि आम्ही त्या त्या दिवसाचे महत्व विचारात घेऊन दिनविशेष लिहित असू. तसेच त्या दिवशी महापुरुषांची पुण्यतिथी वा जयंती असेल तर ती पण विविध कार्यक्रमाने साजरी करत असू.
आज आंतरराष्ट्रीय न्यायदिन, या देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला न्याय मिळावा, कोणावरही अन्याय होवू नये. यासाठी आपण निवडून दिलेले( पैसे घेऊन)लोकप्रतिनिधी विधानमंडळात यासाठी कायदे बनवतात. म्हणून याला कायदेमंडळ असे ही संबोधले जाते, आणि या कायद्यानुसार आपण कायद्याचे ( काय द्यायचे नव्हे) राज्य चालवतो. कोणीही नितीमत्ता सोडू नये आणि आपल्या राज्याने, आपल्या देशाने प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे असा आपण प्रयत्न करतो.
याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र विधानसभेत संविधानाने आपणास दिलेल्या लोकशाही मार्गाने आपण आपले जनप्रतीनिधी, जनसेवक निवडून देतो… आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे जनप्रतीनिधी आम्हा जनतेला अभिप्रेत आणि आमच्या लायकीप्रमाणेच कारभार करतात. अर्थात या कारभाराचे आणि भारतीय लोकशाहीचे मंदिर म्हणजे संसद किंवा विधानसभा. संताची, विचारवंतांची थोर परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अतिशय सुखावह आहे. आज आंतरराष्ट्रीय न्यायदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानसभेच्या प्रांगणात जोरदार राडा झाला. जनसामान्यांच्या दैनंदिन प्रश्र्नांची किती चिंता आहे यानां, अगदी पोटतिडकीने शिव्या देतात, मारामारी करतात, चड्डी बनियनवर कॅन्टीनच्या कर्मच्याऱ्यांशी सुसंवाद साधतात. हे सगळे पाहून या महाराष्ट्रातील तेरा कोटी जनता अगदी सुखावली आहे… या लोकप्रतिनिधींचे कामच एवढे प्रभावी आहे की पुढच्या वेळी पण सूज्ञ मतदार यानाचं पुन्हा प्रचंड मतांनी निवडून देतील.
विधानसभा असो वा विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज चालवण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा चुराडा होतो. अर्थात हा सगळा पैसा करदात्यांचा.. आणि आपण काय पहातो, तू बाहेरच ये, तुला बघतो.. खरचं अशा लोकप्रतिनिधींचा मला तरी बुवा फार गर्व आहे.. त्याहीपेक्षा असे लोकप्रतिनिधीं ज्या सुज्ञ मतदारानी आपले पवित्र मतं देऊन सभागृहात पाठवले ते किती भाग्यवान असतील?


