सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे कसे तीन तेरा वाजलेले आहेत याची जाहीर चिरफाड अनेकदा आमच्या पञकार बंधूंनी प्रिंट मिडिया आणि समाज माध्यमातून केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुडाळ- मालवणचे आमदार निलेशजी राणे यांनी विधानसभेत ओरस येथील सरकारी मेडिकलच्या दुरावस्थेचा मुद्दा सत्ताधारी पक्षात असताना सुध्दा अतिशय प्रभावीपणे मांडला त्यावर काही आवश्यक कार्यवाही होवो न होवो पण सभागृहाच्या पटलावर अधिकृतपणे हा नागरिकांच्या आणि भावी डॉक्टरांच्या भवितव्याशी गंभीर मुद्दा होता. याबद्दल निलेशजी राणे यांचे आभार.
सत्ताधारी असो वा विरोधक सगळेच एकाच माळेचे मणी, सुमारे पच्चावन्न वर्षापूर्वी जेष्ठ साहित्यिक विं. दा. करंदीकर यांनी ” सब घोडे बारा टक्के ” ही लिहून ठेवलेली कविता किती मार्मिक व आजच्या परिस्थितीला किती तंतोतंत जुळणारी होती हे आजही पटतंय.
आमच्या सावंतवाडी काॅटेज हाॅस्पिटलमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही. अनेक रुग्ण उपचारा अभावी मृत्यू पावले. आवश्यक वैद्यकीय अधिकारी आणि इतर सुविधा नसल्याने उपचारासाठी त्यांना बेळगाव, कोल्हापूर किंवा आपले ठरलेले गोवा मेडिकल काॅलेज.. अनेकदा वाटेतच काही रुग्ण राम नाम सत्य है, म्हणतात. अशी अनेक उदाहरणे आहेत.
जीवंतपणी उपचार होत नाही म्हणून रुग्ण दगावले पण मेल्यावरही जर काही पार्थिव असे असतात की त्यांचे पोस्टमॉर्टेम करावे लागते. आत्महत्या केलेले किंवा अपघातात निधन पावलेल्यांचे कायद्याने पोस्टमॉर्टेम करावेच लागते. मात्र त्यासाठी ती कला अवगत असणारा प्रशिक्षित कटर लागतो. हा जो कटर असतो तो हाॅस्पिटलमध्ये जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात त्यापैकी एकाला ट्रेन केले जाते. सावंतवाडी व दोडामार्ग या दोन्ही तालुक्यातून असे अनेक पार्थिव सावंतवाडीच्या काॅटेज हाॅस्पिटलमध्ये येतात. किंवा कटरना त्या त्या हाॅस्पिटलमध्ये जावे लागते. दिवसेंदिवस अपघात व आत्महत्या यामुळे ही संख्या वाढलेली आहे. याच काॅटेज हाॅस्पिटलमध्ये २०१६ पासून कटर वेळेत उपलब्ध नसणे ही समस्या आहे. मेहतर नावाचे कटर होते ते कोरोना मध्ये वारले. एक वर्षापूर्वी पांडू नावाचे कटर होते ते निवृत्त झाले. आता फक्त सुजीत नावाचे एकच कटर आहे जे एकाच ठिकाणी उपलब्ध होवू शकत नाही. त्यामुळे पार्थिव तासनतास शवागृहात शवविच्छेदनासाठी ठेवावे लागते. याचा अनुभव मी अनेकदा घेतलाय.
दोन दिवसांपूर्वी माझे परममित्र स्व. विकासभाई यांचे निधन झाले. भविष्यात काही कायदेशीर बाबी निर्माण होवू नये म्हणून शवविच्छेदनासाठी आम्ही भाईंचे पार्थिव सकाळी साडेदहा वाजता घेऊन गेलो. कटर उपलब्ध नव्हते ते शिरोड्याला होते. भाईंचे पार्थिव तेथे ठेवण्यापूर्वी त्या ठिकाणी आणखीन दोन पार्थिव शवविच्छेदनासाठी ठेवलेले होते. शिरोड्याहून दुपार नंतर आल्यावर या तिन्ही पार्थिवांचे शवविच्छेदन संध्याकाळी झाले. तोपर्यंत त्यांचे चाहते, आप्तेष्ट, नातेवाईक या सगळ्याना झक मारत तिष्ठत रहावे लागले.
जीवंतपणी उपचार नाही म्हणून जीव जातात आणि मेल्यावरही पोस्टमॉर्टेम करण्यासाठीही तासनतास वाट पहावी लागते.. व्यवस्थेचे कितीही पोस्टमॉर्टेम करा.. गेंड्यांची कातडी पांघरलेली माणसे जोपर्यंत या व्यवस्थेत आहेत तोपर्यंत हे असेच चालणार. स्व. विकासभाई सारखा नेता असो वा रस्त्यावरचा सर्वसामान्य माणूस प्रत्येकाला या व्यवस्थेचे चटके सहन करावे लागत आहेत.
‘पोस्ट मार्टेम’ सडलेल्या व्यवस्थेचे ! – ॲड. नकुल पार्सेकर यांचा प्रासंगिक विशेष लेख.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


